शिंदे-फडणवीसांमध्ये 50 मिनिटांच्या बैठकीत काय झालं? `वर्षा`वर हजर शिवसेना नेत्याने केला खुलासा, `दोघेही...`
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा असून, आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. दोघांनी जवळपास 50 मिनिटं चर्चा केली.
Eknath Shinde Devendra Fadnavis Meet: शपथविधी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असून त्याची जोरदार तयारी सुरु आहे. आझाद मैदानात भव्यदिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पण दुसरीकडे अद्यापही महायुतीमधील नाराजीनाट्य संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. गृह खात्यावरुन शिवसेना-भाजपात एकमत झालं नसल्याचा दावा आहे. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्याआधी सोमवारी गिरीष महाजन ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यामुळे नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ज्युपिटरमध्ये चेकअपसाठी पोहोचले होते. यानंतर त्यांनी वर्षा बंगला गाठला होता. दरम्यान रात्री 7 वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. जवळपास 50 मिनिटं चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यासाठी रवाना झाले. या भेटीनंतर शिवसेना नेते भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नेमकं काय घडलं याची माहिती दिली.
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्येच चर्चा होती. इतर कोणीही चर्चेला नव्हतं. आम्ही आत होतो, मात्र दुसऱ्या ठिकाणी बसलेलो होतो. वर आमदारांमध्ये कोणी किती मताने निवडून आलं, कशी मदत झाली यावर चर्चा सुरु होती. आम्ही शिंदे फडणवीस यांच्यातील चर्चा ऐकली नाही. आम्हाला त्यातील काही माहिती नाही," असं भरत गोगावले यांनी सांगितलं. सकाळी ठाण्यात आमची भेट झाली. तिथे तब्येतीची विचारपूस केली आणि तिथून निघालो अशी माहिती त्यांनी दिली.
संभाव्य मंत्र्यांचा शपथविधी घ्यावा या मागणीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल". गृहमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही असल्याबद्दल समजत आहे असं विचारलं असता ते म्हणाले, "हे पाहा, मागायला काय हरत आहे. निर्णयाचे सर्वाधिकार साहेबांकडे आहेत. आम्ही त्यात मध्यस्थी करत नाही आणि करणारही नाही".
ही रस्सीखेच इतके दिवस का सुरु आहे? असं विचारलं असता ते म्हणाले, "शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेबांना अधिकार दिले आहेत. साहेब ठरवती ते 60 आमदारांना मान्य असेल. आमच्यात कोणताही वाद नाही. अजून कोणाची नावं जाहीर नाहीत, खात्याचा प्रश्न नाही, मग वादाचा प्रश्न कुठे आला?". तिन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटतंय की शपथविधी व्हावा. पण काही धोरण ठरलं असले तर ते ठरवतील असंही त्यांनी सांगितलं. "60 च्या 60 आमदमरांना मंत्री व्हावं असं वाटत असेल. त्यात जितके बसतील त्यांनाच दिलं जाईल. मर्यादा आहे त्यानुसार साहेब ठरवतील," असं त्यांनी स्पष्ट केलं.