`अजित पवारांमुळे आमची बार्गेंनिंग पॉवर...`, CM पदावरुन रामदास कदम यांचा मोठा आरोप; `कितीही प्रयत्न केले तरी...`
Ramdas Kadam Allegations: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
Ramdas Kadam Allegations: अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा थेट आरोप शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले तर आम्हाला चालणार आहे असं विधान राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. यामुळे निर्विवाद बहुमत मिळवलेल्या महायुतीत मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
रामदास कदम नेमकं काय म्हणाले?
"भाजपाच्या मंडळींना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, शिवसेनेच्या आमदारांना वाटतं एकनाथ शिंदे व्हावेत. अजित पवार तर आता सरेंडर झाले आहेत. त्यांनी आमची बार्गेनिंग पॉवर कमी केली आहे हा वेगळा भाग आहे," असा आरोपच रामदास कदम यांनी केला आहे. पण मुख्यमंत्रीपदावरुन कोणी, कितीही, काहीही प्रयत्न केले तरी आमच्या युतीत मतभेद होणार नाहीत असंही ते म्हणाले आहेत.
'एकनाथ शिदेंचा चेहरा घेऊन आपण...', संजय शिरसाट स्पष्टच बोलले, म्हणाले 'फडणवीसांच्या बाबतीत...'
"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही लढाई झाली होती. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून ही लढाई लढली आणि मोठ्या प्रमाणात यश मिळवून दिलं आहे. आता झुकतं माप कोणत्या बाजूला टाकायचं याचा निर्णय श्रेष्ठींना घ्यायचा आहे," अंस रामदास कदम म्हणाले आहेत.
'आमचा 72 टक्क्यांचा स्ट्राईक रेट'
अमोल मिटकरी यांनी रामदास यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. "रामदास कदम यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असल्याने तो संताप साहजिक आहे. पण त्यांना विचारा 80 पैकी 55 जागा तुमच्या आल्या आहेत आणि 55 पैकी आमच्या 41 आल्या. 72 टक्के स्ट्राईक रेट असताना आम्ही तुमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली की आमची तुम्ही कमी केली हा प्रश्न मी विचारु शकतो. पण तूर्तास राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी जे नाव अंतिम केलं जाईल त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे," असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
"जर रामदास कदम यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटत असेल आणि आमच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली असेल तर मला वाटतं हा निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा जोक आहे. ते फार मोठे नेते आहेत, त्यामुळे शांत राहावं. उगाच तळपळाट करुन काही भेटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत अभेद्य आणि मजबूत आहे," असंही त्यांनी सांगितलं आहे.
महायुतीत धुसफुस सुरु आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले, "महायुतीत आलबेलच आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की, 135 जागा भाजपाच्या आल्यानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच दावा राहणार. जर भाजपाच्या 70-75, शिदेंच्या 50-55 आणि आमच्या 40-45 आल्या असत्या तर मग आम्ही आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी मागणी केली असती. पण आता ते करण्याची वेळ नाही. आपल्यात आलबेल आहे आणि ते टिकवून ठेवावं. रामदास कदम यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने उगाच काहीतरी बोलून नवा वाद निर्माण करु नये. एकनाथ शिंदेंनीच सर्वांना तशी विनंती केली आहे. आम्हालाही पक्षाच्या सूचना आहेत. अन्यथा आम्हालाही ट्वीट करता येतं. आम्हीही म्हणू शकतो की, शिंदेसेनेमुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली, त्यांना बाजूला ठेवा आणि महायुतीत भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार आणा. पण आम्ही असं बोलणार नाही. कारण आम्हाला पक्षाने मर्यादा घालून दिल्या आहेत. रामदास कदम यांनी असं बोलू नये. असंही योगेश कदम यांना कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे, त्यासाठी जोर लावावा".
"त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असं त्यांना वाटणं साहजिक आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. आम्हालाही ते आवडतात, पण तो प्रश्न नाही. आमचीही अजित पवारांनी किमान एका वर्षासाठी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे. नायक चित्रपटाप्रमाणे अजित पवार महाराष्ट्रात ताळ्यावर आणतील असा आम्हाला विश्वास आहे. पुढच्या वर्षी आषाढी एकादशीची पूजा अजित पवारांनी करावी असं आम्हालाही वाटतं. पण शेवटी तो महायुतीचा अंतिम निर्णय आहे. दुसऱ्यामुळे आपली बार्गेनिंग पॉवर कमी झाली असं म्हणून महायुतीत विध्वंस करण्याचं काम रामदास कदम यांनी करु नये," असंही त्यांनी सांगितलं.