विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे 10 उमेदवार पडले, शिवसेनेचा थेट आरोप
मनसेमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडले असा थेट दावा शिवसेनेनं केलाय
बातमी आहे मनसे शिवसेनेतल्या नव्या वादाची. विधानसभेत एकनाथ शिंदेमुळे मनसे भाजपची युती झाली नाही अशी चर्चा मनसेच्या गोटात सुरू झाली. त्यानंतर आता शिवसेनेनंही मनसेवर आरोप केलेत. मनसेमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडले असा थेट दावा शिवसेनेनं केलाय. बघुयात नेमकं काय घडलंय.
'मनसेमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार पडले'
शिवसेनेचा मनसेवर निशाणा
शिंदेंवर केलेल्या आरोपांमुळे शिवसेना नाराज
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे भाजप युती बघायला मिळू शकते. मात्र त्याआधीच मनसेच्या शीवतीर्थावरील बैठकीतल्या वक्तव्यानं या संभ्याव्य महायुतीत मिठाचा खडा पडला. विधानसभा निवडणूकीत मनसे - भाजपच्या एकत्र येण्यात एकनाथ शिंदेंनी खोडा खातल्याचा आरोप मनसेच्या मुंबईतल्या बैठकीत करण्यात आला. यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे दहा उमेदवार पडले असा दावा शिवसेना नेते योगेश कदम यांनी केला आहे.
दुसरीकडे मनसे आगामी निवडणुकीत महायुतीत येणार असेल तर मतविभाजन टाळण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल असं सूचक वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनीही मनसेच्या आरोपांवर शिवसेनेची भूमिका मांडली.
लोकसभा निवडणुकीत मनसेला भाजपकडून 1 ते 2 जागा मिळण्याची अपेक्षा होती. तेव्हा अमित ठाकरेंना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चाही रंगली. पण ऐनवेळी राज ठाकरेंनी महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला.. तेव्हा एकनाथ शिंदेंना ही युती नको होती अशी चर्चा रंगली होती. विधानसभेतही बऱ्याच चर्चांअंती शेवटी मनसेनं एकला चलो रेची भूमिका घेतली. या दोन्ही निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा नकार मनसेला महायुतीत येण्यापासून रोखत राहिला. मात्र आता मनसेनं थेट एकनाथ शिंदेंकडे बोट दाखवलं, त्यामुळं शिवसेनेनंही विधानसभा निवडणुकीचा हिशोब मांडत मनसेमुळे आपले 10 उमेदवार पडल्याचा थेट आरोप केलाय. त्यामुळं महापालिका निवडणुकीसाठीही भाजपसोबत युतीचा मार्ग मनसेसाठी सोपा नसणार असंच दिसत आहे.