दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय जाधव यांनी राजीनामा पाठवला आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय सदस्य नियुक्त करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे. इथे राष्ट्रवादीचा खासदार, आमदार नसतानाही त्यांना संधी देण्यात आल्याने शिवसेना खासदार संजय जाधव नाराज झाले. त्यातूनच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून दिल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई करत या वादातून तोडगा काढला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई करत काल मध्यरात्री एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. या चर्चेतून वादावर तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे. 


आज सकाळी शिवसेना खासदार संजय जाधव यांच्याशीही मिलिंद नार्वेकर यांनी सकाळी सात आणि दहा वाजता फोनवरून सविस्तर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याकरता संजय जाधव यांना निरोपही दिला असल्याची माहीती मिळतेय. संजय जाधव यांना मुख्यमंत्र्यांनी उद्या भेटीसाठी बोलावलं आहे.