मुंबई : परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे. या बैठकीला परभणीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते-मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांचा आरोप होता. त्यांनी यामुळे काल पक्षाचा राजीनामा दिल्याचं वृत्त देखील समोर आलं होत. पण शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'खासदार संजय जाधव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांची कोणतीही नाराजी नाही. त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांच्या मतदारसंघातील जी कामं होती ती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. संजय जाधव यांनी कोणतीही नाराजी दर्शवलेली नाही. संजय जाधव यांच्या मतदारसंघातील कामा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबधित अधिकाऱ्यांनाही सांगितले आहे.'


एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटलं की, 'ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार, खासदार आहेत. त्याप्रमाणे सूत्र ठरलेलं आहे. संजय जाधव यांनी राजीनामा दिलेलाच नाही त्यामुळे मागे घेण्याचा विषयच नाही.'


परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर आता त्यांची नाराजी दूर होते का हे पाहावं लागेल.