मुंबई : औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष पद काँग्रेसकडे जात असल्याने  शिवसेना नेते अब्दुल सत्तार नाराज आहेत. अब्दुल सत्तार यांनी आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.  झेडपीचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्याच्या मुद्यावरून सत्तारांना दूर ठेवण्यात आलं होतं. हेच सत्तारांना बोचलं असल्यामुळे त्यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मंत्र्यांनी राजीनामा दिला तर तो मुख्यमंत्र्यांकडे अथवा राज्यपालांकडे दिला जातो. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला अथवा दिला नाही यामागचं सत्य मुख्यमंत्रीच सांगू शकतात. या बातम्या मी पाहिल्या. जर ते नाराज आहेत तर ते नाराज का आहेत? हे मला माहित नाही. त्यांना मंत्रीपद दिलं आहे पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं. राजकारणात थोडी तडजोड ही करावीच लागते. तसेच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात त्यांचा योग्य तो सन्मान राखला आहे. तसेच सेनेने सत्तारांचा पूर्ण सन्मान राखला आहे. जास्त जागा नसताना सत्तारांचा योग्य तो सन्मान केला आहे.' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 


'जेव्हा ते शिवसेनेत आले तेव्हा त्यांनी शिवबंधन बांधून मरेपर्यंत हे हातात ठेवेन असा शब्द दिला होता. संध्याकाळी मी त्यांच्याशी संवाद साधेन, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. एवढंच नाही तर शिवसेनेचे नेते नाराज नाहीत, अशी माहिती देखील संजय राऊत द्यायला विसरले नाहीत. 


दीपक सावंतांच्या नाराजीवर बोलले राऊत 


दीपक सावंत देखील हातातील शिवबंधन सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. दीपक सावंत यांनी देखील पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'दीपक सावंत हे जुने जाणते आहेत. त्यांच्याशी देखील चर्चा केली. 'आपल्या भावना आम्ही लवकरच पक्षप्रमुखांकडे पोहोचवू,' असा दीपक सावंत यांना शब्द देण्यात आला आहे. 'सध्या पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदावर व्यस्त आहेत. त्यामुळे योग्य ती वेळ आल्यावर त्यांच्या भावना पोहचवू, असा शब्द राऊतांनी दिला आहे. 


संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवारांना टोला लगावला आहे.  जैसी करणी वैसी भरणी  असा आरोप मुनगंटीवारांनी केला होता. भाजपनं फूस लावल्याचा आरोप चुकीचा असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले होते. महाविकासआघाडीचं लक्ष फक्त खुर्चीवर, खातेवाटपावरून महाविकासआघाडीत भांडण असा आरोप लावला होता. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'अशा प्रकारचे स्वप्न पाहतात ते बहुतेक झोपेत असतात. राजकारणात सुरूवातीला असे धक्के बसतात. पण एकदा ती गाडी सुरू झाली की, ती सुसाट धावते.' 



खातेवाटपावर बोलले राऊत 


राजकीय घडामोडींबाबत पवारांशी चर्चा केल्याचं देखील यावेळी राऊत म्हणाले. खातेवाटपावर मुख्यमंत्री बोलतील. दोन्ही पक्षाचं खातेवाटप हे त्या त्या पक्षांच आहे. त्यामुले त्या पक्षाच्या प्रमुखांनी ते खातेवाटप केल्याचं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.