मुंबई : मी पोकळ धमक्या देत नाही. मी एक्शन करणारा व्यक्ती असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. अभिनेत्री कंगना राणौतच्या आरोपानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये या बाईला एकदा शुटिंगला पाठवायला हवं असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला. हा मुंबई, महाराष्ट्राचा अपमान आहे. पोलिसांनी शहीद होवून मुंबई वाचवलीय, रक्षण केले. अशा मुंबई पोलिसांवर कुणीतरी एैरगैरे लोक ज्यांचा मुंबईशी संबंध नाही असे लोक बोलतायत असेही राऊत यावेळी म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण करण्याचे षडयंत्र आहे. भाजपवर हे बुमरॅंग होईल असेही ते म्हणाले. गृहमंत्र्यांनी तात्काळ यावर कारवाई करावी. तसेच मुंबईत मेंटेल केसेस वाढतायत, त्याकडं आरोग्य विभागानं लक्ष द्यायला हवं असा टोला त्यांनी लगावला. 



सध्या मुंबईची स्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी POK झाल्याचे वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने केले आहे. काही दिवसांपूर्वी कंगना राणौत हिने मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटत असल्याचे म्हटले होते. यावरून संजय राऊत यांनी कंगनाला फटकारले होते. तुम्हाला मुंबई पोलिसांविषयी विश्वास नसेल, इतर राज्यातील पोलिसांची सुरक्षा हवी असेल तर तुम्ही आपल्या राज्यात निघून जावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. 


या टीकेला कंगना राणौत हिने ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले आहे. तिने म्हटले आहे की, शिवसेना नेते संजय राऊत हे मला जाहीरपणे धमकी देत आहेत. मुंबईत परत येऊ नकोस, असे सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर माझ्यावर टीका करणाऱ्या ग्राफिटी काढण्यात आल्या होत्या. यानंतर आता मला जाहीर धमकी दिली जात आहे. मुंबई अचानक पाकव्याप्त काश्मीरसारखी का भासू लागली आहे, असा सवाल यावेळी कंगनाने उपस्थित केला. त्यामुळे आता कंगनाच्या या टीकेला शिवसेनेच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी गेल्यावेळप्रमाणे पुन्हा एकदा कंगना राणौतची बाजू उचलून धरली आहे. त्यांनी म्हटले की, शिवसेनेच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा निषेधार्ह वक्तव्य करण्यात आले आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूड आणि ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी महाविकासआघाडीचे सरकार मुंबई पोलिसांवर दबाव आणत आहे. काही नेत्यांनाही वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, झाशीची राणी असलेली कंगना शिवसेना नेत्यांच्या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार नाही, असे राम कदम यांनी म्हटले आहे.