मुंबई : विरोधात बसण्याची भूमिका घेणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर जाण्याचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवारांनी काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पवार आज मुंबईत परतणार असून राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून दोन दिवसात ते पुन्हा सोनिया गांधींना भेटणार आहेत. विरोधी पक्षात बसायचे असते तर हा सगळा खटाटोप करण्याची गरज नव्हती. मात्र शिवसेनेबरोबर जाण्याचा पर्याय खुला असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात या राजकीय घडामोडी घडत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राज्यातील जनभावना ही भाजप विरोधात असल्याचे पवारांनी सोनिया गांधींना सांगितले आहे. याचाच अर्थ जनभावना लक्षात घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवायला हवं असं शरद पवारांनी सोनिया गांधींना पटवून देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पवारांच्या पुढील खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.


शरद पवारांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर नव्या समीकरणांच्या हालचालींनाही वेग आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पवार राज्यात कुणाकुणाशी चर्चा करणार आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव करण्याच्या दिशेनं पावलं टाकणार का याची उत्सुकता आहे. 


शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं समीकरण कसं जुळणार?



महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची कोंडी अजूनही फुटलेली नाही. दिल्ली दरबारी देखील राज्यातील सत्तेचा पेच सुटू शकलेला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच सत्तेची कोंडी फोडण्याची जबाबदारी अमित शाहांनी सोपवली आहे. त्यामुळे शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री समसमान मंत्रिपदांचा फॉर्म्युला ऑफर करण्याची शक्यता आहे, मात्र त्यानंतरही कोंडी फुटणार का? आज तेराव्या दिवशी तरी युतीतील चर्चा सुरू होणार का? याकडे लक्ष लागलंय. तर शिवसेनेच्या गोटात नेमकं काय सुरू आहे?.