बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वृक्षतोड, शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
एकीकडे आरेमध्ये वृक्षतोडीला विरोध पण याला समर्थन...?
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : एकीकडे आरेमध्ये वृक्षतोड झाल्यावर शिवसेनेनं याचा विरोध केला, आणि सत्तेत येताच त्याला स्थगिती सुद्धा दिली, मात्र असाच काहीसा प्रकार औरंगाबादेत सुद्धा सुरु आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादच्या प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडण्यात येणार आहे, शिवसेनेचा याला मात्र विरोध नाही हे विशेष.
औरंगबादच्या सिडको भागात हे प्रियदर्शनी उद्यान आहे. या भागात 10 हजारावर झाडं आहेत. 17 एकर परिसरात हे उद्यान पसरलं आहे. याठिकाणी 70 प्रजातींचे पक्षी. 50 वर प्रकाराची फुलपाखर, अनेक छोटे मोठे प्राणी हे याचं वैभव. मात्र हेच वैभव आता संकटात येणार आहे. कारण महापालिकेनं केलेल्या ठरावानुसार येथं शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे..
या प्रकल्पाचा एकूण खर्च 64 कोटी रुपये आहे. उद्यानाचा परिसर 17 एकरमध्ये पसरला आहे. पुतळ्याची जागा 1135 स्क्वेअर मीटर आहे. फुड पार्कसाठी जागा 2330 स्क्वेअर मीटरची असणार आहे. संग्रहालसाठी 2600 स्क्वेअर मीटरची जागा आहे. तर मनोरंजनासाठी मोकळी जागा 3690 स्क्वेअर मीटरवर असणार आहे.
आता इतक्या सगळ्या बांधकामासाठी फक्त 500 झाडं कशी तोडावी लागणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे, 2017ला महापालिकेनं हा स्मारकाचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून हा विरोध सुरुच आहे, आता वाद कोर्टात गेला आहे.
धक्कादायक म्हणजे महापालिकेनं पुतळ्याचा कोनशिला बसवला आणि तिथंच कच-याचे ढिगही लावले, अखेर फिरणा-या लोकांनीच ते साफ केले. आरेला झालेली वृक्षतोड आणि त्यानंतर शिवेसेनेनं घेतलेली भूमिका याचं कौतुक झालं, मात्र याच शिवसेनेची झाडांबाबतची भूमिका औरंगाबादेत वेगळी आहे.