शेतकरी कर्जमाफीवरून सत्तेतल्या शिवसेनेचं आंदोलन
अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली
औरंगाबाद : अडीच महिन्यापूर्वी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आणि त्यासाठी ऑनलाईन फॉर्म सुद्धा भरायला सांगितले मात्र अजूनही कर्जमाफीचे पैसै कधी मिळणार वा माफ होणार हे स्पष्ट होत नाहीये. त्यामुळं सत्तेत असलेल्या शिवसेनेनंसुद्धा आता सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
गेल्या दोन वर्ष कर्जमाफीची सततची मागणी अखेर फडणवीस सरकारनं अडीच महिन्यांपूर्वी मान्य केली. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी कर्जमाफी असल्याचं सांगत दीड लाखांपर्यंत सगळं कर्ज माफ करणार असल्याची घोषणाही करण्यात आली. मात्र यासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची अट ठेवण्यात आली आणि गोंधळ सुरू झाला.
अनेक ठिकाणी अर्ज भरता येत नव्हते तर काही ठिकाणी अनंत अडचणी होत्या. यात सरकारला शेवटची तारीखही बदलावी लागली मात्र इतकं सगळं करूनही अजूनही अर्ज भरणंच सुरू आहे. शेतक-याला कर्जमाफी अजूनही मिळालीच नाही. मिळाली ती फक्त आणि फक्त आश्वासनं त्यामुळे शेतकरी चांगलाच संतापलाय.
आता या विरोधात सत्तेत असलेली शिवसेनाच रस्त्यावर उतरलीय. सरकारनं शेतक-यांचा अंत न पाहता दस-याच्या आधी कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी द्यावीच असा इशारा सरकारला दिलाय. शिवसेनेनं मोर्चा काढत तत्काळ कर्जमाफीची मागणी केली.
तर ऑक्टोबर महिन्यात कर्जमाफीचे पैसे शेतक-यांच्या खात्यात जमा होतील, अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतक-यांना पैसे मिळतील अशी माहिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात दिली.
एकीकडे मुख्यमंत्री आश्वासन देतायत तर सत्तेत असलेली शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करतेय, मात्र सरकारमध्ये राहूनही हे घडवून का आणत नाही? हा प्रश्न आहे. असो राजकीय पक्ष सगळ्याचंच राजकारण करतो, मात्र या सगळ्यात कुणीही शेतक-याचा अंत पाहू नये इतकीच माफक अपेक्षा.