कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : बंडखोरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये संघर्ष वाढला आहे. शिंदे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. मात्र अद्यापही उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबाबत इतरांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांनीही शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात युवा नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता असे वक्तव्य पत्रकार परिषदेत केलं आहे.


अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणात युवा नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी केली गेली. यात भाजपचे नेते आणि मंत्री नारायण राणे यांचाही सहभाग होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून राणे काय बोलतायत हे सांगितले. त्यांनीही (मोदी) प्रतिसाद दिला. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरु झाला. नंतर त्यांची भेट झाली.  मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार होते, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. 


दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे खुलासे केल्यानंतर शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


"दीपक केसरकर नविन प्रवक्ते झाल्याने कॅमेरा दिसला की ते बोलत सुटतात. एकनाथ शिंदे यांच्यापुढे छाप पाडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशानं शिंदे गटाची ते माती करतायत. यामध्ये गौप्यस्फोट काय आहे. यामध्ये इतकी विसंगती आहे. एकदा शिवसेनेत आहोत बोलतात,एकदा वेगळे आहोत बोलतात, अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.


कोर्टात जे सुरूय त्यामुळं ते बिथरलेत. म्हणूनच एकनाथ शिंदेंना बरे नव्हते असं समजलं. परंतु या गौप्यस्फोटाला कोणताही आधार नाही, असेही मनिषा कायंदे म्हणाल्या.


राणेंविषयी भूमिका बदलणार नाही - मनिषा कायंदे


नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांविषयीची आमची भूमिका बदलणार नाही. राणेंना केंद्रीय मंत्रिपद देवून भाजपनं ठाकरेंना दुखावलंय. त्यामुळे आमची भूमिका बदलणार नाही, असेही कायंदे म्हणाल्या.


तेजस ठाकरे राजकारणात आले तर शिवसैनिकांना आनंद -  मनिषा कायंदे


तेजस ठाकरे शिवसैनिकांमध्ये सुपरिचित आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित होते.  शिवसैनिकांना ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम आहेच. त्यामुळे त्यांच्या घरातील आणखीन एक सदस्य आले तर आनंदच आहे. तेजस ठाकरे याचं स्वतःचे व्यक्तीमहत्त्व आहे. त्यामुळे ते सक्रिय राजकारणात आले तर शिवसैनिकांना आनंदच आहे,अशी प्रतिक्रिया मनिषा कायंदे यांनी दिली.