मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जुनी नाती पुढे नेत पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची युती झाली आणि टीकाकारांनी स्वबळाच्या घोषणा देणाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. युती होणार नाही, असं म्हणत स्वबळावरच पक्षाचा झेंडा फडकवू असा दृढ निश्चय करणाऱ्या शिवसेनेची आणि तशाच प्रतिज्ञा घेणाऱ्या भाजपची सोमवारी युती झाली. २०१९ या वर्षातील लोकसभा निवडणूकांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले. शिनसेना २३ आणि भाजप २५ अशा जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीरही करण्यात आला. पण, या निर्णयाचं स्वागत मात्र फारसं चांगलं झालं नाही. अनेकांनीच दोन्ही पक्षनेत्यांना भूतकाळात केलेल्या घोषणाबाजीची आठवण करुन देत परिस्थितीची जाणिव करुन देण्याचा प्रयत्न केला. युतीची घोषणा करतेवेळी आयोजित कार्यक्रमात झालेलं राजकीय नाट्य आणि मनोमिलन होत असताना अनेकांच्या चेहऱ्यावरील भावही टीपले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युतीच्या निर्णयानंतर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून नेमकी काय भूमिका मांडली जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर एका दिवसाच्या एकंदर आढाव्यानंतर परिस्थिती आणि होणाऱ्या सर्व टीका पाहत 'सामना'तून टीकाकारांना शिवसेनेच्याच शैलीत सुनावण्यात आलं आहे. शिवसेनेची तलवार ही दुधारी आहे. 'वारे' आमच्या दिशेने वळले, असं म्हणत शिवसेनेची तलवार ही 'म्यानबंद' नाही, हे अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं आहे. इथे 'वारे' म्हणजे नेमकं काय हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. नाव न घेता भाजपचा उल्लेख करत युती म्हणजे लाचारी, माघार आणि तडजोड नाही ही बाब अधोरेखित करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.  


२०१४ च्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय अपेक्षित होता, असं म्हणत त्यांची सध्याची लोकप्रियता काहीशी कमी झाली असल्याची वस्तूस्थिती अग्रलेखातून मांडण्यात आली. या तुलनेत काँग्रेसच्या राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारली, यात भर पडली ती म्हणजे प्रियांका गांधी यांची हा मुद्दाही त्यात मांडण्यात आला आहे. दबावाला शिवसेना कधीच बळी पडली नाही आणि पडणारही नाही असं म्हणत राम मंदिर, शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि युती होण्याची नेमकी कारणं अशा प्रश्नांची उत्तरं ही साकारात्मकच आहेत, हे सूचक विधान अग्रलेखातून करण्यात आलं आहे. युतीविषयी चर्चा करण्यासाठी स्वत: अमित शाह मातोश्रीवर आले आणि शिवसेनेने त्यांना काय सांगायचं, बोलायचं होतं ते 'ठाकरी' शैलीत त्यांच्यासमोर ठेवलं हे अग्रलेखातून स्पष्ट केलं आहे. तेव्हा आता हे प्रत्युत्तर पाहता 'ठाकरी' शैलीचा परिणाम युतीच्या राजकारणावर किती काळ टीकून राहणार यावरच विरोधकांचं आणि जनतेचंही लक्ष असणार यात शंकाच नाही.