महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान, `टाळी...`
शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरु असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रिकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलेत. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे. राष्ट्रवादीत दोन्ही बाजुने टाळी वाजत आहे. तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे. संजय शिरसाट आणि शिवसेना एकप्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहे काय़ अशी चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही शिवसेना कटुता विसरुन एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपापसात विचारु लागले आहेत.
संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
"ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करु. आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आम्ही भांडणं लावणारे नाही तर जोडणारे लोक आहोत. नातं जोडणं हे शरद पवारांकडून शिकावं," असं संजय शिरसात म्हणाले आहेत. तुमच्यात तसं काही व्हावं असं वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले, "आम्हाला वाटून काय उपयोग आहे. दोन्ही हातांनी टाळी वाजणं गरजेचं आहे. त्यांच्या टाळ्याही वाजतात आणि गळ्यात हारही घालतात. आमचं सोडून द्या, पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे".
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया
"आमचे हात कापायला निघालेले आणि टाळीचा विचार करत आहेत. संकुचित विचार करुन राजकारण होत नाही. संस्कृती, नाती जपावी लागतात. सर्व नाती तोडून पाठीत खंजीर खुपसून जाणाऱ्यांसंबंधी भावना, विचार करणं योग्य नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात भेटतो, एकमेकांना हाक मारतो, हस्तांदोलन करतो. ही संस्कृती आजही जिवंत ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने केलं आहे. पण पूर्ण पक्ष, नाव, चिन्ह घेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याबद्दल चिड आहे," अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे.
कसा आहे विधानसभा निवडणूक निकाल
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे. महायुतीची अक्षरश: त्सुनामी आली आणि 234 जागा जिंकल्या. एकट्या भाजपाने 132 जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीला मात्र फक्त 50 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. विआत सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ 16 जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेला 20 जागा मिळाल्या. मनसेला तर एकही जागा जिंकता आली नाही.