Sushma Andhare on Ajit Pawar: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी जाहीर मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आहे. आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर टिप्पणी करत असताना सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही अशी खंत त्यांनी शरद पवारांसमोर बोलून दाखवली. विधानसभेत अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेते असून विधान परिषदेत अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्याकडे जबाबदारी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साताऱ्यात भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आपल्याला आलेले अनुभव सांगताना सुषमा अंधारे यांना अश्रू आवरत नव्हते. या देशात वाघांची, हत्तींची गणना होते, पण भटक्यांची जनगणना व्हावी असं सरकारला वाटत नाही. जनावरांपेक्षा आमची वाईट अवस्था आहे अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते. 


मी चळवळीतली असून शिवसेनेत कशी आली असा प्रश्न अनेकांना पडतो. मी कितीही ओरडून सांगितलं तरी मुख्य प्रवाहापर्यंत माझा आवाज पोहोचत नव्हता. मुख्य प्रवाहातील लोकांना माझे प्रश्न त्यांना कळतच नव्हते. मी जे प्रश्न मांडते ते माणसांचे प्रश्न आहेत असं त्यांना वाटतच नव्हतं अशी खंत मांडताना सुषमा अंधारे यांनी संधी दिल्याबद्दल उद्धव ठाकरेंचे आभार मानले. 


शरद पवार मंचावर असतानाच सुषमा अंधारे ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, "साहेब ..."


 


"शरद पवारांसमोर बोलणं थोडं धाडसाचं आहे. पण आमदार अश्लाघ्य पद्धतीने माझ्यावर टिप्पणी करत असताना एकाही पोलीस स्थानकात तक्रार लिहून घेतली गेली नाही. सार्वजनिक ठिकाणी हा सगळा कंटेंट आहे. सभागृहात आपण सगळे विरोधी पक्षनेते म्हणून बाकावर बसतो. सभागृहात विरोधी पक्षनेत्यांनी यासंबंधी प्रश्न विचारायला हवा होता. माझं चुकत असेल तर कान पकडा. मी लाख वेळा माफी मागायला तयार आहे," असं सांगताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर होत होते. 


"ज्या जमिनीत मी उगवून आले ती कसदार आहे आणि आम्ही दमदार पद्धतीन उगवून आलो आहोत", असं सुषमा अंधारे यांनी ठणकावून सांगितलं. यावेळी त्यांनी शरद पवारांना राजीनामा मागे घेण्यासाठी लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. तसंच माझं संपूर्ण कुटुंब आज तुमच्यामुळे सुरक्षित आहे असं त्यांनी सांगितलं. 


"आता जे आमदार म्हणून निवडून आले आहेत, शिंदे गटातील आमदार बायकांबद्दल इतकं अश्लाध्य पद्धीतने बोलतात, बाई म्हणजे पायातील वाहन असल्यासारखं वागतात. या सगळ्यांना सत्तेवरुन खाली खेचायचं असले तर महाविकास आघाडी हवी. त्यासाठी तुम्ही असायला पाहिजे. आम्ही एका पक्षाचा नेता असा स्वार्थी विचार करत नाही. स्थिर सरकार हवं आणि त्याशिवाय उद्योग येणार नाहीत आणि आमच्या मुला बाळांच्या हाताला रोजगार मिळणार नाही," असं आवाहन त्यांनी शरद पवारांना केलं.