मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपला कार्यकाळ संपताना देशातील मुस्लीमांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचे सांगितले. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुसलमान संकटात आहे ही त्यांची भावना होती तर उपराष्ट्रपतीपदाचा त्याग करून त्यांनी याआधीच ही भावना व्यक्त करायला हवी होती, असं म्हणत शिवसेनेनेही ‘सामना’तून हमीद अन्सारी यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 एक दशक उपराष्ट्रपतीपद भोगल्यावर अन्सारी शेवटच्या दिवशी ‘जाता जाता’ हे सर्व बोलतात ही वेदना नसून सत्ता सुटल्याची व्यथा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.  अन्सारी हे गेले दशकभर देशाचे उपराष्ट्रपती होते व अत्यंत संयमी, ज्ञानी, राजकीय जाणकार म्हणून त्यांची ख्याती होती. ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी अशी प्रतिमा त्यांनी शेवटपर्यंत जपली असताना शेवटच्या दिवशी त्यांच्या अंतरात्म्याचा असा स्फोट व्हावा याचे आश्चर्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. हमीद अन्सारी यांनी असुरक्षिततेची भावना व्यक्त करताना मुसलमानांच्या मनातील धर्मांध भावना व अराष्ट्रीय अंधश्रद्धेवरही प्रहार करायला हवा होता. मुसलमानांनी समान नागरी कायदा स्वीकारावा व ‘शरीयत’च्या गुलामी बेडय़ा झुगारून द्याव्यात असे सांगणारे हमीद अन्सारी आम्हाला हवे होते अशी भुमिकाही 'सामना' तून मांडण्यात आली आहे. 


 हिंदूच्या मनातही असुरक्षितता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणाऱयांपासून हिंदूंच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा राष्ट्रघातकी प्रवृत्तीपासून देशाला धोका आहे ही जनभावना असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुसलमानांतील        मोठा वर्ग ‘वंदे मातरम्’ म्हणायला तयार नाही. हा राष्ट्रगीत व मातृभूमीचा अपमान आहे. ‘‘देश सोडू, पण ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही’’ असे फूत्कार सोडणाऱया मुसलमान नेत्यांना हमीद अन्सारी यांनी फटकारले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढली असती. गोरक्षणाच्या निमित्ताने मुसलमानांवर होणारे हल्ले जितके भयंकर तितकेच भयंकर ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देणे असल्याचा पुनरउच्चार त्यांनी यावेळी केला.


 मुसलमानांनी जबाबदारीचे भान ठेवले तर...


समान नागरी कायदा, तीन तलाक हे विषय जसे देशासाठी महत्त्वाचे आहेत तसे मुसलमानांच्या सामाजिक व कौटुंबिक प्रगतीसाठीही तोलामोलाचे आहेत.  मुसलमानांनी त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवले तर त्यांना या देशात कसलेच भय बाळगण्याचे कारण नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केवळ भारतातच मुस्लिम सुरक्षित असून पाकिस्तानात तर इस्लामी राजवट असूनही मुसलमानांच्या जीवनाचा ‘नरक’ बनला आहे. इराक, बांगलादेश, अफगाणिस्तान, सीरियातील मुसलमान जनता अन्नपाण्यास मोताद बनली आहे. अमेरिकेतून मुसलमानांना घालवून देण्याची भाषा तेथील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. युरोपातील अनेक राष्ट्रे मुसलमानांना नजरेसमोर धरायला तयार नाहीत हे याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.