उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मातोश्रीवर सध्या बैठकांचं सत्र सुरु आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मातोश्रीवर बैठक पार पडली. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय आढावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघासह मावळ पुणे शिरूर या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. इंडिया आघाडीमध्ये आपण असल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, साथ द्या अशा सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी केल्या. 


बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती आहे यासंदर्भात विधानसभेच्या दृष्टीनेही उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. या लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभा जागेसाठी विचार करू शकतो या संदर्भात त्यानी नेत्यांना विचारणा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली आहे. 


बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार असू तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा असं म्हणणं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे समोर मांडलं आहे. 


मावळसाठी नेत्यांचा आग्रह


उद्धव ठाकरेंनी यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचाही आढावा घेतला. मावळ लोकसभा मतदार संघात उरण, पनवेल, कर्जत, पिंपरी, चिंचवड, मावळ हे विधानसभा मतदार संघ येतात. 
यामध्ये सुरुवातीला उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर किती पदाधिकारी कोणासोबत आहेत याची माहिती मागवण्यात आली. प्रत्येक मतदारसंघात कोणाची किती ताकद आहे याचीही माहिती घेण्यात आली. 



बैठकीत बंड केल्यानंतर आणि अगोदर अजित पवार गट आणि शिंदे गटाची परिस्थिती काय आहे याविषयी विचारणा करण्यात आली. महाविकास आघाडी असली तरी मावळ लोकसभा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी अशी भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली आहे.



मावळ लोकसभा खासदार


2009 ते 2014 - गजानन बाबर, शिवसेना


2014 ते 2019 - श्रीरंग बारणे, शिवसेना (शिंदे गट)


2019 ते आतापर्यंत - श्रीरंग बारणे, शिवसेना (शिंदे गट)