`दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा`, उद्धव ठाकरेंचा घणाघात
`शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे`, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray On Pm Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा वर्षे महाराष्ट्राचे प्रेम आणि आशीर्वाद मिळाला आहे. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो, हा मोदीजींनी अनुभवावा", असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नुकतंच त्यांनी 'सामना' वृत्तपत्राला एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'सामना' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीसह राम मंदिर, कोरोना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही घणाघात केला. यावेळी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भेकड आणि गद्दार हा विषय चालला आहे. हा विषय जनतेमध्ये पोहोचलेला आपल्या प्रचारात दिसतोय का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले "फारच तीव्रतेने तो जाणवतोय आणि तुम्ही मघाशी जो उल्लेख केलात माझ्या छातीवरती असलेल्या मशालीचा, तशाच जनतेच्या हृदयामध्ये मशाली पेटल्या. कारण ती एक आग आहे."
"त्यांनी महाराष्ट्राचा घात केला"
आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात! कारण बघा तुम्ही. 2014 आणि 2019 ला प्रधानमंत्रीपदी मोदीजी पोचले, त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40 पेक्षा अधिक खासदार हे एकटय़ा महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी गद्दारी केली नाही; तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात. कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच. हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच, त्या शिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती"
हे मी एवढय़ासाठी म्हणतो, कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजींनी आपल्या गावाला म्हणजे गुजरातला नेले. महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले, मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेले, मेडिकल डिव्हाईस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, वेदांता-फॉक्सकॉन तिकडे नेला. पण हे सर्व आपण पाहत बसलो. मोदी, शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातील आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरबाडून नेत असताना आपण सगळे हे फक्त त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या. आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्या वेळेला ते नेऊ शकले नव्हते, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
"आता महाराष्ट्राचा शाप काय असतो, हा मोदीजींनी अनुभवावा"
आता मात्र या सगळ्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन झालं नं. म्हणजे डबल इंजिन सरकार लागल्यानंतर वेगाने हे उद्योगधंदे पळवले. आपल्या हातात आता सत्ता नाहीये. महाराष्ट्रात बेकारी वाढतेय, बेरोजगारी वाढतेय, सगळं काही वाढतंय. हा जो एक राग आहे. तुम्ही आमचा का घात केलात? महाराष्ट्राचा का घात केलात? आज मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. आणि त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्षे मिळाला आहे. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो, हा मोदीजींनी अनुभवावा, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी मोदींवर केला.