Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज विधानभवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. विधानभवनातील केबिनमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरेही यावेळी त्यांच्यासोबत होते. दरम्यान भेटीदरम्यान आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवरही भाष्य केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अजित पवारांना राज्यासाठी चांगलं काम करा सांगितलं. सध्या सत्तेसाची साठमारी चालली आहे, त्यामुळे इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये. पुराचं पाणी भरत आहे. आधी पाऊस नव्हता आणि आता अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल होईल. त्यामुळे या साठमारीत जो मूळ शेतकरी, राज्याचे नागरिक यांच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंती अजित पवारांना केली," अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. 


पुढे ते म्हणाले "अजित पवारांनी अडीच वर्ष माझ्यासह काम केलं आहे. यामुळे मला त्यांच्या स्वभावाची कल्पना आहे. इतरांचे सत्तेसाठी डावपेच सुरु असले तरी त्यांच्याकडून राज्याला मदत मिळेल याची मला खात्री आहे. कारण त्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत".


शिवसेनेत बंडखोरी करणारे आता अजित पवारांसहच सत्तेत आहेत असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले "खरं कोण, खोटं कोण हे कळण्याइतकं महाराष्ट्रातील जनता खुळी नाही. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हे मी आधीही सांगितलं. सरकार स्थापन झालं तेव्हा मी शुभेच्छा दिल्या आहेत".
 
किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओवर बोलताना त्यांनी म्हटलं की, "मी किळसवणारे आणि बिभत्स व्हिडीओ पाहित नाही. पण त्यावर राज्यातील जनता आणि खासकरुन महिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या भावनांची कदर सरकारने ठेवावी". 


उद्धव ठाकरेंनी बंगळुरुत झालेल्या बैठकीबद्दल बोलताना सांगितलं की, "काल आणि परवा दोन दिवस बंगळुरुत देशप्रेमी पक्षांची एक बैठक झाली. देशप्रेमी आणि लोकशाही पक्षांची आघाडी झाली आहे. ही लढाई एखादी व्यक्ती किंवा पक्ष नाही तर हुकूमशाही विरोधात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री येत जात असतात पण जो पायंडा पडत आहे तो घातक आहे. त्यामुळे देशप्रेमी, लोकशाही पक्ष एकत्र येऊन त्याविरोधात लढत आहेत".