Uddhav Thackeray on Barsu Refinery: बारसू रिफायनरीवरुन (Barsu Refinery) सध्या वाद पेटलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) मुख्यमंत्री असतानाच पत्र लिहिल्याता दाखला सत्ताधाऱ्यांकडून दिला जात आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्र लिहिल्याची कबुली दिली आहे. मुंबईत आयोजिक कामगार सेनेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"बारसूवरुन सध्या रान पेटवलं जात आहे. मी पत्र दिल्याचं सांगितलं जात आहे. हो मी पत्र दिलं होतं. मी कुठे नाही म्हणत आहे. जर मी पत्र दिलं होतं, तर मग तो प्रकल्प राबवला का नव्हता? लोकांवर जबरदस्ती का केली नव्हती? माझं इतकं ऐकता तर मग गद्दारी करुन सरकार कशाला पाडलं? आरे, कांजूरचा निर्णय रद्द का केला? बुलेट ट्रेन आणा पण रोज कितीजण सकाळी उठून अहमदाबादला जाणार आहेत. मी राज्याच्या मुळावर येणारे विषय अडवले होते आणि यापुढेही अडवणार. मी करोना सेंटर उभे केले ते नाही पाहिले. पण सरकार पाडून ते बुलेट ट्रेनवाल्यांच्या घशात घातलं," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. "नाणार, बारसूची भूमिका माझी नाही, तर तिथल्या लोकांची भूमिका होती," असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. 


"नाणारला विरोध केला कारण राजापूरमधील एका कार्यक्रमात मला मंचावर येऊन आंदोलनात साथ देण्यासाठी लोकांनी विनंती केली होती. पर्यावरणाला हानी करत असल्यान आपण विरोध केला होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतून सतत हा प्रकल्प राबवा असं सांगितलं जात होतं. यानंतर मी प्राथमिक अहवाल घेत हा प्रकल्प कुठे राबवला जाऊ शकतो हे पाहिलं. बारसूची जागा समोर आल्यानंतर तेथील लोकांनी ठराव मंजूर केल्याचं सांगण्यात आलं. सरकार पाडण्याच्या अवधीत वरुन संमती दिली यानंतर पोलिसांनी घरात घुसून केसेस टाकल्या. लोकांच्या टाळक्यावर काठ्या मारुन प्रकल्प चांगला असल्याचं का सांगितलं जात आहे? हिताचा प्रकल्प असेल तर जबरदस्ती कशासाठी? जे मी ठरवलं होतं ते हे सरकार का करु शकत नाही," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. 


"गावकऱ्यांसमोर जे काही समज, गैरसमज असतील ते दूर करा. पारदर्शकता आणली पाहिजे. पण त्याऐवजीत पोलिसांची मदत घेऊन माता-भगिणींना फरफटत नेत आहात. आम्ही काही म्हटलं की विकासाच्या मधे येतात अशी टीका करतात. पण या प्रकल्पाचं सत्य लोकांसमोर आलंच पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पूजा झाली असेल तर लोकांसमोर जावं," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. बारसूमधील प्रकल्प लाोकांना दाखवून त्यांच्या मनातील संशय दूर करा. कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे की नाही हे त्यांना सांगा असाही सल्ला उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.