`देवेंद्रजी कुटुंब तुम्हालाही आहे हे लक्षात ठेवा, अन्यथा नुसतं शवासन...`; उद्धव ठाकरेंची जाहीर धमकी
Uddhav Thackeray on Fadnavis: देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे.
Uddhav Thackeray on Fadnavis: देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडेही आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना इशारा दिला आहे. मुंबईतील पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवरुन टीका केली. चौकशीला आम्ही घाबरत नाही. नियमाच्या पुढे जावून काही गोष्टी कराव्या लागतात असं यावेळी त्यांनी सांगितलं.
"सध्या ते कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहे. पण त्या काळात जे काही सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा नेहमी पहिला क्रमांक आला ही यांची पोटदुखी आहे. भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्यांचं नाव त्या यादीत नव्हतं. या पोटदुखीसाठी त्यांना या निवडणुकीत जमालगोटा द्यावा लागेल. यांना घोड्यांचेच औषध द्यावे लागेल. एकदाच कोटा व्यवस्थित साफ करावा लागेल," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
पुढे ते म्हणाले की "करोना काळातील घोटाळ्याच्या नावे सध्या बोभाटा सुरु आहे. सूरजच्या घरावर धाड टाकली. तो एक साधा शिवसैनिक आहे. ठाकरे कुटुंबाला धक्का असं बोललं जात आहे. यांच्या मनात किती भीती बसली आहे. मी पाटण्याला गेलो तर लगेच फडणवीस हे परिवार बचाओ बैठकीला गेलेत असं म्हणाले. या पातळीवर येऊ नका. देंवेद्रजी तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. तुमच्या परिवाराचे काही व्हॅाटसअप चॅट बाहेर येत आहेत. त्यावर बोलावं लागलं तर नुसतं शवासन करावं लागेल. इतर आसनं तुम्हाला झेपणार नाहीत. त्यामुळे माझ्या परिवारावर बोलू नका. त्याबद्दल मी संवेदनशील आहे. संपूर्ण महाराष्ट्र, शिवसैनिक माझा परिवार आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी. आता तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोणी दुसरं घेत असेल तर मला माहिती नाही".
"सध्या देश संयमामुळेच चालला आहे. भाजपाच्या हातून देश कधीच सुटला आहे. सध्या मला खलनायक केलं जात आहे. पण मी नायक की खलनायक हे जनताच ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहिती आहे," अशी टीका त्यांनी भाजपावर केली.
"मी आजही जिथे जिथे जातो तिथे लोक मला येऊन आम्ही तुमच्यामुळे वाचलो असं सांगतात. महाराष्ट्राबाहेर लोकही पाठीशी असल्याचं सांगतात. अनेक आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. माझं तर आव्हान आहे की, मुंबई पालिकेच्या कारभाराची नक्की चौकशी करा, पण त्यावेळी एपिडमिक अॅक्ट होता. त्याचा अर्थ आणीबाणीच्या स्थितीत नियमाच्या बाहेर जाऊन लोकांचा जीव वाचवावा लागतो. आपण त्यालाच प्राधान्य दिलं. चौकशी करायची असेल तर ठाणे पालिकेची करा. भाजपा आमदार संजय केळकर यांनी ती मागणी केली आहे. पण फडणवीसांनाच महत्त्व नाही तर यांना किती असणार? हिंमत असेल तर नागपूर, पुणे पालिका यासह काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्यांच्या कारभाराची चौकशी करा. पीएम केयर फंडचीही चौकशी करा", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पीएम म्हणजे काय प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? असा टोलाही त्यांनी लगावला.