Uddhav Thackeray and Sharad Pawar Meet: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यानिमित्ताने बंडखोरीची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी मात्र सर्व दावे फेटाळले असून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. एका कार्यक्रमात अजित पवार यांनी सत्ता आल्यास आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं जाहीरपणे सांगितलंही आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर तसा प्रस्तावच ठेवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन बंड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवार यांनी सर्व दावे फेटाळले असले तरी चर्चा मात्र अद्याप कायम आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून शरद पवार यांच्याकडे एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यामध्ये ठाकरे गटाने जर आगामी काळात महाराष्ट्रात सत्ता आली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात तयारी दर्शवली आहे. महाविकास आघाडी टिकावी यासाठी ठाकरे गटाकडून सुरु प्रयत्न सुरु असून त्याचाच हा एक भाग असल्याची माहिती मिळत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसमोर प्रस्ताव ठेवला आहे की, भलेही त्यांच्याकडे महाविकास आघाडीचं नेतृत्व असलं तरी जर उद्या सत्ता आली तर राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्यासंबंधी कोणतीही शंका नसेल. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी आपली काही हरकत नसल्याचं सांगितलं आहे. याचं कारण त्यांची प्राथमिकता पक्षाला मजबूत करणं आणि शिंदे-भाजपा यांना हरवणं आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर काँग्रेसची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. 


"उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना भेटून आम्ही आमचा मुख्यमंत्रीपदावरील दावा मागे घेतो असं सांगितलं. ही खरी शोकांतिका आहे. तुम्ही राष्ट्रवादीमधील कोणालाही मुख्यमंत्री करु शकता असं त्यांनी सांगितलं आहे. ज्या मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार, तत्वं, हिंदुत्व यांनी सोडून दिलं, ती मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही गेली. ज्यासाठी यांनी पक्ष सोडला तो दावाही यांनी सोडला आहे," अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.