Uddhav Thackeray Press Conference : राज्याच्या सत्तासंघर्षावर आज, मंगळवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court Maharashtra Political Crisis) सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्ट निकाल देणार की पुढील तारीख मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान दुसरीकडे राजधानी दिल्लीत बीबीसीच्या (BBC IT Raid) कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली असून कारवाई सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. 'मातोश्री'वर (Matoshree) पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वावरुनही (Hindutva) भाजपाला (BJP) लक्ष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"गेले पाच ते सहा महिने मातोश्री अन्यथा शिवसेना भवन येथे लोकांची रिघ लागली आहे. माझ्यासह या परिस्थितीत सोबत राहणारे येतच आहेत, पण रियाज सेन तुमच्यासारखे अनेकजण महाराष्ट्रात जे काही झालं ते पसंत नाही, हे असंच सुरु राहिलं तर हुकूमशाही येण्यास वेळ लागणार नाही, म्हणून देश वाचवण्यासाठी शिवसेनेसोबत येत आहेत हे महत्त्वाचं आहे", असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.


"लोकशाहीची जी चार स्तंभ असताना त्यात माध्यम महत्वाचा स्तंभ आहे. मी तुमच्याशी आता बोलत असताना बीबीसीच्या कार्यालयावर धाड पडली असल्याचं बातमी सुरु असेल. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावर धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं. याचा अर्थ आम्ही काही केलं तरी आवाज उठवायचा नाही. आवाज उठवला तर चिरडून टाकू, ही पाशवी वृत्ती फोफावण्याचा प्रयत्न करत असून, आपण एकत्र आलो नाही आणि ताकद वाढवली नाही तर संपूर्ण देश खाऊन टाकेल," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 


"दोन दिवसांपूर्वी मी उत्तर भारतीयांच्या एका छोट्या कार्यक्रमात गेलो होतो. तेव्हाही मी त्यांना तेच सांगितलं होतं. तेव्हा स्वातंत्र्य मिळवण्याची लढाई सुरु होती आणि आता स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई सुरु आहे. स्वकियांची असो किंवा परकीयांची असो, गुलामगिरी ही गुलामगिरीच असते. कोणत्याही परिस्थितीत भारतमाता गुलाम करण्याचा प्रयत्न सुरु असून ते रोखायला एकत्र यायला हवे," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 


"आमचं हिंदुत्व म्हणजे काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अनेक मुस्लीम बांधव, भगिनी आमच्या पक्षात आल्याची बातमी आल्यावर पुन्हा एकदा हिंदुत्व सोडलं अशी टीका होईल. पण जर मुस्लिम येतायत म्हणून हिंदुत्व सुटत असेल तर मोहन भागवत मशिदीत गेले होते, तेव्हा ते काय सोडून आले? दत्तात्रय होसबाळे गोमांस खाणाऱ्यांना दरवाजा बंद करता येणार नाही असं म्हटलं होतं. मग त्यांनी काय सोडलं?," अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.


"शिवसेनाप्रमुखांनी राष्ट्रीयत्व हेच आपलं हिंदुत्व अशी शिकवण आपल्याला दिली आहे. जो देशद्रोही असतो त्याची जात-पात काहीच नसतं, तो देशद्रोहीच असतो. या एकाच विचाराने तुम्ही सोबत आला आहोत. तुमची ताकद फक्त आम्हाला नाही तर महाराष्ट्राला बळ देईल," असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.