शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. रामदास तडस यांच्या मुलाने पत्नीला रस्त्यावर आणलं सध्या तिच्याकडे मुलाचा सांभाळ करण्यासाठी काहीच पैसे नसल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केली आहे. नागपुरात सुषमा अंधारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामदास तडस यांच्या सून पूजा तडसही (Pooja Tadas) मुलासह उपस्थित होत्या. यावेळी पूजा तडस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 20 तारखेला आपल्याला भेटण्याचं आवाहन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


"पूजा यांच्याशी खासदार रामदास तडस यांच्या मुलाने कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केलं हे सर्वांना माहिती आहे. कारवाई टाळण्यासाठी हे लग्न कऱण्यात आलं होतं. पण मोदींच्या खासदाराच्या कुटुंबाने परिवाराचा सांभाळ केला नाही. लग्नानंतर तिला ज्या फ्लॅटवर ठेवलं गेलं, तो फ्लॅट विकला. त्यामुळे तिला रस्त्यावर यावं लागलं. आज मुलाची सांभाळ करायला ही तिच्याकडे आर्थिक तरतूद नाही," असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. सुषमा अंधारे यांनी यावेळी विवाह प्रमाणपत्रंही दाखवलं. 


"लग्न करुनही जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार हॅशटॅग लावतात हे भयंकर आहे. पूजा जनसंपर्क कार्यालयात गेली असता तिथेही अपमान करुन बाहेर काढलं जातं. बाळंतपणातही तिची काळजी घेतली जात नाही. तिच्या वडिलांसमोर बापाचे पुरावे मागण्यात आले," असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 


पूजा तडस यांनी यावेळी सांगितलं की, "आपल्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न केलं का? लग्नानंतर मला एका फ्लॅटवर ठेवलं. माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापरण्यात आलं. त्याच्यातून बाळाचा जन्म झाला. बाळ जन्माला आल्यानतंर हे बाळ कोणाचं आहे, याचा डीएनए कर सांगत आरोप करण्यात आले. एक खासदार, लोकप्रतिनिधी डीएनए कर सांगत असेल तर समाजातील महिलांनी कोणाकडे जायचं? दरवेळी माझा अपमान करण्यात आला. घऱी गेली असता लोखंडी रॉडने मला मारण्यात आलं".


"बाळाला घेऊन मी सगळीकडे फिरत आहे. फ्लॅट विकून मला बेघर करण्यात आलं. इतक्या खालच्या पातळीला जाऊन राजकारण केलं जात असेल तर माझ्यासारख्या स्त्रियांनी कुठे जायचं? खासदार म्हणतात मी मुलाला बेदखल केलं आहे. मग त्याला घरात का ठेवलं आहे? मला एकटीलाच का बाहेर काढलं? माझ्याशी राजकारण करता. महिला सबळीकरणाच्या बाता मारल्या जातात. मोदीजी देश माझा परिवार आहे म्हणतात. मोदीजी तुम्ही रामदास तडस यांच्यासाठी 20 तारखेला सभा घेण्यासाठी वर्ध्यात येणार आहात. तेव्हा मला दोन मिनिटांचा वेळ द्या. हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे," असं पूजा तडस म्हणाल्या आहेत. 



"भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अशा अनेक कहाण्या रोज बाहेर येऊ शकतात. मोदींना माझी विनंती आहे तुम्ही प्रभू श्रीरामाचे नाव घेता तर त्यांचा एक वचनी एक पत्नी बाणा स्वीकारा. मोदींनी एक वचनी एक पत्नी संस्कार पक्षात तरी शिकवले तरी अनेक माय माऊलींचे जीवन वाचतील," असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. नैतिकता म्हणून मोदींनी तडसांची उमेदवारी रद्द केली पाहिजे केली अशी मागणीही त्यांना केली. मात्र पूजा तडस यांनी कोणाचीही उमेदवारी रद्द करा अशी माझी मागणी नाही. मी स्वाभिमानी आहे असं म्हटलं. 


पंकज तडस यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे एक राजकीय षडयंत्र आहे. माझ्याकडे 10 हजार ऑडिओ क्लिप आहेत. सुषमा अंधारेने स्वतः संसार बघावा. हा हनीट्रॅप चा प्रकार आहे असं पंकज तडस म्हणाले आहेत. माझ्याकडे हजारो पुरावे आहेत. माझं प्रकरण न्यालयीन प्रलंबित आहे असं त्यांनी सांगितलं आहे.