पुण्यात लोकसभा निवडणूक संपताच सेना-भाजपमध्ये धुसपूस सुरु
शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसपूस
अरुण मेहेत्रे, पुणे : भाजपा- शिवसेनेनं पुण्यातील लोकसभा निवडणूक एकदिलानं लढली. मात्र निवडणूक संपताच दोघांमध्ये धुसपूस सुरु झालीय. महापालिकेतील सत्तेमध्ये वाटा मिळण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. असं असताना, लोकसभेसाठी युती केली मग आता महापालिकेच्या सत्तेत देखील सहभागी करून घ्या, अशी शिवसेनेची मागणी आहे. लोकसभेसाठी युतीची घोषणा झाल्यानंतर आपल्याला तसा शब्दच देण्यात आला होता, असा दावा शिवसेनेनं केला आहे.
या पार्श्ववभूमीवर महापालिकेतील विविध विषय समित्या तसेच प्रभाग समित्यांचं अध्यक्षपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही होती. प्रत्यक्षात मात्र त्यामध्ये शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसली गेली. त्यामुळे शिवसैनिक नाराज झालेत. सत्ताधारी भाजपकडून युतीधर्म पाळला जावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.
भाजप शिवसेनेला सत्तेत वाटा देण्यास तयार असल्याचं भाजपतर्फे स्प्ष्ट करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संवाद नसल्यानं त्यांना नेमकी कुठली पदं हवीत याबाबत एकमत नाही तसंच विविध पदांसाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत शिवसेनेकडून प्रतिसाद आला नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे.
पुणे महापालिकेत भाजपचे ९८ सभासद आहेत, तर शिवसेनेचे १० सभासद आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्यातील संबंध कसे राहिले हे साऱ्यांनीच पाहिलं. आता निवडणुकी नंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणण्याची वेळ आलीय. थोडक्यात काय तर, स्थानिक पातळीकर का होईना युतीचा गोडवा किती काळ टिकणार याबद्दल साशंकता आहे.