नागपूर : भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर होऊ घातलेल्या पालघरच्या पोटनिवणडणुकीत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला. पालघर मतदारसंघातून शिवसेनेनं चिंतामण वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देऊन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. पालघरच्या या खेळीनंतर शिवसेनेनं आता भाजपपुढे नवी गुगली टाकली आहे. भंडारा-गोंदियाच्या पोटनिवणडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय दोन दिवसांमध्ये घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. भंडारा गोंदियाचे भाजपचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भंडारा गोंदियामध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीबद्दल शिवसेनेनं सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.


उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. नागपुरातल्या रवी भवनमध्ये त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विदर्भातील लोकसभा मतदार संघ निहाय आढावा घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते.


'हा लोकशाहीचा अपमान'


ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह का निर्माण झालं. ईव्हीएममध्ये मतदाराला मत कुठे गेले हे कळत नाही हा लोकशाहीचा अपमानच असल्याचं त्यांनी सांगताना शिवसेनाचा व्हीव्हीपॅटला पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं.


'मला पंतप्रधान व्हायचं नाही' 


राहुल गांधींना पंतप्रधान व्हायची इच्छा असेल, ती त्यांची भावना आहे. मला तरी सध्या पंतप्रधान व्हायचे नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नागपुरात गडकरींविरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे निवडणुका लागल्यावर ठरवणार असल्याचंही उद्धव ठाकरे बोलले.


'दिखाव्यासाठी अधिवेशन नको'


विदर्भाबाबत चांगले निर्णय होणार असतील तर पावसाळी अधिवेशन नागपुरात घ्यावे नुसते दिखाव्यासाठी अधिवेशन घेऊ नये असं स्पष्ट मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं. विदर्भ महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणा-यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा मागणीचे त्यांनी समर्थन केले.