धक्कादायक, तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले
महाराष्ट्रात तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.
मुंबई : महाराष्ट्रात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असताना निसर्गाच्या कोपामुळे हवालदिल झालेल्या तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. दुर्दैवाचीबाब म्हणजे शेतकरी आत्महत्यांचे लोण वाढले असताना, राजकारण्यांचा सत्तेचा खेळ अजूनही संपलेला नाही. शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे ढोल बडवणाऱ्या आणि कर्जमाफीची गाजरं दाखवणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे धक्कादायक वास्तव.
महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून, एकट्या नोव्हेंबर महिन्यातच ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामध्ये मराठवाड्यातील १२०, तर विदर्भातील ११२ शेतकऱ्यांचा समावेश होता. एकाच महिन्यात एवढ्या आत्महत्या होण्याचा गेल्या ४ वर्षातला हा पहिलाच प्रकार आहे. ऑक्टोबर महिन्यातही सुमारे १८६ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली... आधीच्या वर्षाच्या तुलनेत आत्महत्यांचं प्रमाण तब्बल ६१ टक्क्यांनी वाढलंय. २०१८ मध्ये २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. तर २०१९ मध्ये हेच प्रमाण २ हजार ५३२ वर पोहोचले.
दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीत सत्तेचा सारीपाट रंगला होता. या खेळाची नशा एवढी होती की, अवकाळी पावसानं शेतकऱ्याची कशी ससेहोलपट केलीय, हे पाहायला नेत्यांना वेळच नव्हता. देवेंद्र फडणवीस सरकार गेलं आणि उद्धव ठाकरे सरकार आले. पण शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी सरकारने जाहीर केली. पण अटी-शर्थींच्या जंजाळात ती गुरफटून गेली.
दुर्दैवाची बाब म्हणजे अजूनही शेतकऱ्यांचे हाल संपलेले नाहीत. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या ११ लाख शेतकऱ्यांना मदत मिळालेलीच नाही. कुणाच्या वाट्याला कोणते खाते आणि कोणता बंगला यासाठी सत्ताधाऱ्यांच्या तासन् तास बैठका सुरू आहेत. पण आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला जाणत्या राजांनाही वेळ नाही, असेच दिसून येत आहे.