बापरे... राज्यात ७७८ कोरोनाबाधित नवे रूग्ण
३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन
मुंबई : कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुरूवारी राज्यात ७७८ नवे कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत. मुंबई आणि पुणे ही दोन शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत ४२०५ कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातही कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढून ६४२७ एवढी पोहोचली आहे. पण या बरोबरीनेच रूग्ण बरे होण्याचा आकडा देखील वाढत आहे. यापैकी ८४० रूग्ण ठणठणीत बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. राज्यात २८३ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित केलं त्याला गुरुवारी २३ एप्रिल रोजी एक महिना पूर्ण झाला. आधी २१ दिवसांसाठी घोषित केलेला लॉकडाऊन नंतर ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात देशभरात २१ हजारावर रुग्ण वाढले असून कोरोनामुळे दररोज सरासरी २० बळी गेले आहेत. विशेष म्हणजे मुंबईतही रुग्णांची संख्या महिनाभरात १०० पटींनी वाढली आहे.
महिनाभरापूर्वी पुण्यातील पहिल्या कोरोना रुग्णाची टेस्ट उपचारानंतर निगेटिव्ह आली होती. त्यामुळे राज्यातला पहिला रुग्ण बरा झाल्याची बातमी २३ मार्चला आली होती. तर महिनाभरानंतर राज्यात ८४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. याचा अर्थ असा नाही की, संकट गेले आहे. या परिस्थितीतही नागरिकांनी काळजी घ्यावी आणि घरीच राहावे.