विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद :  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (MHADA) विविध पदांच्या 565 रिक्त जागेसाठी भरती परीक्षा घेण्यात येणार होती. पण शनिवारी रात्री म्हाडाचा पेपर फुटला आणि रात्रीतून परिक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेपरफुटीचा गोरखधंदा
धक्कादायक म्हणजे ज्या कंपनीकडे पेपर सेट करण्याचं कंत्राट होतं त्यांच्याकडूनच पेपर फुटीचा हा गोरखधंदा सुरु असल्याचं पोलिस तपासात उघड झालं. धक्कादायक म्हणजे औरंगाबादेतून कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या तीन प्राध्यापकांना पोलिसांनी अटक केली. ज्या कंपनीकडे हे कंत्राट होते त्यांच्या कडून एक मध्यस्थ पेपर विकत घेणार होता आणि औरंगाबादेतील या प्राध्यापकांना तो विकणार होता अशी माहिती समोर आली आहे. 


कोचिंग क्लासेसचं षडयंत्र
औरंगाबादेत टार्गेट करीअर अकदामीचे अजय चव्हाण, सक्षम करिअर अकादमीचे कृष्णा जाधव आणि अंकित चनखोरे यां तिघांनी पेपरची मागणी केली होती आणि त्यासाठी मोठी रक्कम देण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र पोलिसांना प्रकरणाची माहिती झाली आणि तिघेही गजाआड झाले. औरंगाबादच्याच संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या मदतीने हे प्राध्यापक पेपर विकत घेणार होते. हे मध्यस्थ थेट पेपर सेट करणाऱ्या कंपनीच्या संपर्कात होते.


औरंगाबादमधील नावाजलेले क्लासेस
महत्वाचे म्हणजे औरंगाबादेतील हे तिघेही प्राध्यापक नावाजलेले आहेत. गेली 10 वर्ष हे प्राध्यापक अकादमी चालवत आहेत. गणित आणि बुद्धीमत्ता या विषयात प्राध्यापक अजय चव्हाण पारंगत होते. त्यांचे गणितावरची दोन पुस्तकं सुद्धा प्रसिद्द आहेत. चव्हाण यांनी चनखोरे आणि जाधव यांच्यासोबत भागिदारीत क्लासची दुसरी शाखाही सुरु केली होती. गेली काही वर्ष यांचे निकालही चांगले होते. अशाच पेपर फुटीतून निकाल चांगले यायचे का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दरम्यान क्लासेसचीही स्पर्धा वाढली आहे,  व्यवसाय मोठा झाला आहे, त्यातून ज्याचा निकाल जास्त त्याच्याकडे जास्त मुलं जातात म्हणून असले प्रकार वाढत असल्याचं स्पर्धा परिक्षा केंद्र चालवणारे सांगतात.


विद्यार्थ्यांकडूनही होते मागणी
केवळ प्राध्यापकच नाही तर विद्यार्थ्यांकडूनही पेपर साठी काही पैसै देण्याची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक क्लासेस चालकांना यासाठी विद्यार्थी संपर्क करत असत. खास करून वर्ग तीन आणि चार साठीचे हे पेपर फोड़ण्यात येतात. कारण यात ग्रामिण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात असतात त्यांना झटपट नोकरी हवी असते आणी जास्त वाच्यताही होत नाही. म्हणून या असल्या परिक्षात गैरव्यवहार जास्त होत असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.


प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान
पण असल्या प्रकारामुळे जे विद्यार्थी प्रामाणिकपण अभ्यास करुन परीक्षा देतात त्यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे.  त्यांची मेहनत अशा पेपरफुटीमुळं वाया जात आहे त्यामुळं सरकारनं असली प्रकरणं होणार नाही यासाठी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. 


आता प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. त्यातून प्राध्यापकासारखी लोकही अशा गुन्ह्यांकडे वळली आहेत. स्पर्धा परिक्षा आणि त्याचे क्लासेस एक मोठी कोट्यवधींची बाजारपेठ आहे, नोकरीची हमी असेही अनेक लोक जाहीरात करतात, ही हमी अशी पेपर फोडून मिळतेका असा आता संशय बळावतोय.