स्वेटरच्या दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू
सोलापूरातल्या सांगोल्यातली धक्कादायक घटना
सचिन कसबे, झी मीडिया, सोलापूर :धक्कादायक बातमी सोलापुरातून.... स्वेटरची दोरी अडकली, त्याचा गळफास लागला आणि या दुर्घटनेत ९ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. घरात बागडणारा, हसरा खेळता मुलाचा असा मृत्यू झाल्यामुळे घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
फोटोत दिसणारा हाच तो चिमुरडा सोहम शेंडे. सोलापुरातल्या सांगोला तालुक्यात अचकदाणी गावात राहायचा. सोहमचे आई वडील मोलमजुरीसाठी गावात गेले होते. सोहम आजीबरोबर घरात होता. थंडी होती म्हणून सोहमनं स्वेटर घातला होता. पलंगाशेजारच्या खुंटीशी सोहम खेळत होता. खेळता खेळता खुंटीमध्ये स्वेटरची दोरी अडकली आणि सोहमला गळफास लागला. त्यातच चिमुरड्या सोहमचा मृत्यू झाला.
सोहमचा मित्र त्याला बोलवायला आला, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला. लहान मुलांकडे दुर्लक्ष झाल्यानं अशा घटना वाढतायत. लहान मुलांचे कपडे नीट पाहून घ्या... गळ्याजवळ दोरी असलेले कपडे घेऊ नका.... तसंच मुलं गळ्याभोवती ओढणी किंवा कुठला कपडा घेऊन खेळत नाहीत ना, याकडेही लक्ष ठेवा.