अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात काल एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या डोळ्यासमोर वाहून जाणाऱ्या आपल्या मुलांना वाचवण्यात एक बाप अपयशी ठरला. दक्षिण सोलापुरातील लवंगी गावात चार लहान मुले नदी पात्रात वाहून गेली. शनिवारी दुपारी 3.30 च्या सुमारास गावातील शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. याच दरम्यान मुलं देखील तेथे पोहोण्यासाठी गेले. नदी पात्राचा अंदाज न आल्याने चारही मुलं वाहून गेली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 शिवाजी रामलिंग तानवडे हे भीमा नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. थोड्या वेळाने त्यांच्या दोन्ही मुली समीक्षा तानवडे आणि अर्पिता तानवडे तसेच त्यांच्या मेहुण्याची मुलगी आरती पारशेट्टी आणि मुलगा विठ्ठल पारशेट्टी असे चौघे देखील पोहण्यासाठी आले होते. मात्र शिवाजी यांनी त्यांना नदीपात्राजवळून हकलून लावत घराकडे परत पाठवले होते. मात्र शिवाजी पोहोत नदीपात्रात आतपर्यंत गेल्यानंतर चौघे परत नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले. 



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार समीक्षा तानवडे तसेच अर्पिता तानवडे या दोघींना पोहता येत होते. मात्र आरती आणि विठ्ठल पारशेट्टी या दोघांना मात्र पोहता येत नव्हते. नदी पात्राचा अंदाज न आल्याने आरती आणि विठ्ठल दोघेही बुडू लागले. तेव्हा समीक्षा आणि अर्पिता या दोन्ही बहिणींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुळे चौघे देखील पाण्यात बुडू लागले. मुले बुडत असल्याचा आवाज शिवाजी यांना आल्यानंतर त्यांनी मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चारही मुले त्यांच्या हातातून निसटली.


या घटनेत समीक्षा शिवाजी तानवडे वय 13, अर्पिता शिवाजी तानवडे वय 12, आरती शिवानंद पारशेट्टी वय 12, विठ्ठल शिवानंद पारशेट्टी वय 10 अशी चौघे मुले वाहून गेली आहेत. घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोहता येणारे स्थानिक तरुण, मच्छिमार, जीवरक्षक यांच्या साह्याने मुलांचा शोध घेतला जातोय. अद्याप चौघांपैकी कोणीही सापडलेले नाहीत. शोधकार्य सुरू असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांनी दिली.