प्रशांत परदेशी, धुळे : राज्यातली एक धक्कादायक बातमी. आदिवासींना अंमली पदार्थांच्या जाळ्यात ओढलं जातं आहे. आदिवासी भागात अंमली पदार्थांची शेती केली जातेय. यामागे नक्षली आहेत की मुंबईतलं ड्रग्ज रॅकेट? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये गांजाचं पीक


महाराष्ट्रातला आदिवासी पट्टा सोज्वळ, समाधानी आयुष्य जगणाऱ्या आदिवासींना आता लावली जातेय अमली पदार्थांचं व्यसन... करायला लावली जातेय अफू आणि गांजाची शेती... झी २४ तास आज याच ड्रग्ज रॅकेटचा खुलासा करणार आहे. आम्ही दाखवणार आहोत असं धक्कादायक वास्तव जे पाहून तुम्हालाही धक्का बसेल. पोलीस आणि गृह खातं खडबडून जागं होईल.


सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागात काही शेतकरी अफूची शेती करत असल्याचं उघड झालंय. धुळे, नंदुरबारच्या आदिवासी पट्ट्यात सातपुड्याच्या पायथ्याशी गांजा लागवडीची चटक लागलीय. माफिया मंडळी स्थानिक शेतकऱ्यांना चक्क गांजाची शेती करायला भाग पाडतायत. पोलिसांच्या नजरेस पडणार नाही, अशा पद्धतीनं ही शेती पिकवली जातेय. हे अमली पदार्थ मुंबई, पुणे, सूरत अशा महानगरांमध्ये विक्रीसाठी तर नेले जात नाहीत ना, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


2020 या एकाच वर्षात धुळे जिल्ह्यात अमली पदार्थ लागवडीच्या तब्बल 35 घटना समोर आल्या. त्यात सुमारे 3 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे वन जमिनींवर ही गांजाची शेती केली जात असल्यानं ते करणारे कोण आहेत, याचा तपास करणं अवघड झालंय.


इथं पिकवलं जाणारा गांजा, अफू कुठं विकला जातो, याचं उत्तर अजून पोलिसांना सापडलेलं नाही. धुळ्यात 3 ते 5 हजार रुपये किलोनं गांजा विक्री होते. हाच गांजा मुंबईत 18 ते 25 हजार रुपये किलोनं विकला जातो. गांजा, अफू लागवडीमागं मोठी आर्थिक गणितं असल्याचं बोललं जातं आहे. 


याआधी गडचिरोलीतल्या अफू, गांजा पिकवण्याच्या रॅकेटमागं नक्षली कनेक्शन असल्याचं सिद्ध झालं आहे. आता सातपुड्याच्या डोंगररांगातील गरीब आदिवासींचा अंमली पदार्थांच्या शेतीसाठी वापर केला जातो आहे.


झी २४ तासचा EXCLUSIVE रिपोर्ट...