मुंबई : सोशल मीडियाचा वापर कधी कोण कोणत्या गोष्टीसाठी करेल याचा काही नेम नाही. एका प्रेमीजोडप्याने आपल्या आत्महत्येची माहिती सोशल मीडियावर दिली आणि त्यांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देखील दिली. हे प्रकरण तसे थोडे गुंतागुंतीचे आहे. याची माहिती पोलिसांना सकाळी मिळाली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील आहे. येथे एका प्रेमीयुगुलानं विष खाऊन आपल्या आयुष्याचा भयावह शेवट केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वडगावमधील आहे. या तरुण जोडप्यानं रविवारी मध्यरात्री आपल्या सोशल मीडियावर स्वत:च्या श्रद्धांजलीचे फोटो स्टेटसवर ठेवले होते. सोमवारी पहाटे काही मित्रांनी त्याचं स्टेटस पाहून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनीही फोन उचचला नाही. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


या जोडप्याने शेतशिवारात जाऊन आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास दोघांचेही मृतदेह आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच याची माहिती तामसा पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका 22 वर्षीय तरुणाचं गावातील एका 18 वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. या दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं आणि त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे या जोडप्यानं हे टोकाचं पाऊल उचलले.