शशिकांत पाटील, लातूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे अनुकंपा तत्वावर नोकरी मागण्यासाठी गेलेल्या तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनीही जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र पीडित तरुणी मला फसवत असल्याचा आरोप जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर शहरात राहणाऱ्या या २२ वर्षीय तरुणीचे वडील जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याअंतर्गत येणाऱ्या मतिमंद विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला होते. मात्र वर्ष २००७ मध्ये त्यांचे निधन झाले. पुढे शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून या २२ वर्षीय तरुणीने रीतसर अर्ज केला. मात्र सतत पाठपुरावा केल्यानंतर नियुक्ती देण्यासाठी लातूरचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी पैसे आणि शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप या तरुणीने केलाय. 


पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लैंगिक शोषण कलम तसेच ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र सदर तरुणी दिशाभूल करून फसवणूक करीत असल्याचा आरोप सुनील खमितकर यांनी केलाय.  २२ वर्षीय तरुणीच आपल्याला रात्री-अपरात्री मेसेज करीत असल्याचे त्यांनी यावेळी दाखविले. षडयंत्र रचून मला अडचणीत आणण्याचा हा प्रकार असल्याचे खमितकर यांनी म्हटलं आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनीही या प्रकारची गंभीर दखल घेतली असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर पोलिसांनीही या प्रकरणी लैंगिक शोषण कलम आणि ऍट्रॉसिटी कायद्यातर्गत लातूरच्या शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केलाय. 


विशेषबाब म्हणजे सुनील खमितकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी पीडित तरुणीवर खमितकर यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हाही दाखल झालेला. दरम्यान पीडित तरुणी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या या प्रकरणामुळे, आरोप प्रत्यारोपांमुळे या संपूर्ण प्रकारामुळे लातूर जिल्हा परिषद हादरून गेली आहे. आता तपासात नेमकं हे प्रकरण कुठल्या दिशेला जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.