धक्कादायक! जन्माला येण्यापूर्वीच बाळाची ऑनलाईन विक्री
नात्याला काळीमा फासणारी घटना
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मेहुणीच्या पोटातील मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याची विक्री करण्यात आली आहे. दत्तक देण्याच्या नावाखाली त्याची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रस्ताव पुढे करून पैशांची मागणी करणारे एक धक्कादायक प्रकरण औरंगाबाद पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी निकिता खडसे आणि शिवशंकर तांगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकिता खडसे आणि शिवशंकर तांगडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. शिवशंकरने यांची मेहुणी सात महिन्यांची गरोदर असून तिला नवऱ्याने सोडले आहे, तिला दुसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे मेहुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते विक्री करायचे आहे. त्याबदल्यात पैशांचीही त्याने मागणी केली होती.
शिवाय निकिता खडसे आणि शिवशंकर तांगडे यांनी फेसबुकवर पीपल अॅडॉप्शन ग्रुपमधून दत्तक मूल घेऊ इच्छिणाऱ्यांची यादी देखील मिळवली होती. त्यातील काहींशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करून आर्थिक व्यवहाराबाबत चर्चाही केली होती. या बाबत पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी आरोपी शोधून गुन्हा दाखल केला आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. अशावेळी औरंगाबादमधील या प्रकाराने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याची विक्री केली जात असल्यामुळे बाळाची आई आणि या मंडळींबद्दल राग व्यक्त केला जात आहे. ज्या निरागस बाळाने हे जग देखील पाहिलं नाही. त्याच्या जन्मापूर्वीच विकण्याचा व्यवहार होत आहे. ही अमानुष घटना समोर येत आहे.