पुणे : शनिवारी संध्याकाळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. आता त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. कुटंबातील आठ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत. महापौर यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. 


थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. आपला, मुरलीधर मोहोळ, महापौर असं त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. 



महापौर मुरलीधर मोहोळ पुण्याच्या करोना विरुद्धच्या लढाईत पहिल्यापासूनच नेतृत्व करत आहेत. पुणे पालिका हद्दीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे निर्णय घेतले. लॉकडाऊन, कंटेन्मेंट झोन, रुग्णांवरील उपचार याबाबत सरकारच्या व पालिकेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले. मोहोळ यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर कुटुंबियांची तपासणी करण्यात आली. यानंतर एकाच कुटुंबातील ८ जणांचा कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.