एकट्या जिल्ह्यात 9600 मुलींचे बालविवाह, 18 वर्षांआधीच लेकी गर्भवती; प्रशासनही हादरलं
या जिल्ह्यात गेल्या अडीच वर्षात 9 हजार 600 मुलींचे बालविवाह झाल्याचं स्वतः महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत जाहीर केले आहे.
प्रशांत परदेशी, नंदुरबार : जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीने संपूर्ण जिल्हा प्रशासन हादरले आहे. गेल्या अडीच वर्षात 9 हजार 600 मुलींचे बालविवाह झाल्याचं स्वतः महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत जाहीर केले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही आकडेवारी समोर आल्याबरोबर एकच खळबळ उडाली आहे. 52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये महिला व बालकल्याण विभागाच्या विषयावर चर्चा सुरू झाली.
जिल्ह्यातील वाढते कुपोषण नियंत्रणात कसे आणता येईल? यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातील 52 हजार 773 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात 9 हजार 600 मुलींचे म्हणजेच 18.96% मुलींचा बालविवाह झाल्याचा समोर आला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील 2 हजार 365 मुली या अठरा वर्षाच्या आतच गर्भवती होऊन आई झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ही आकडेवारी जाहीर केली आहे.
या आकडेवारी नंतर जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात नाराजी व्यक्त करत, अस्तित्वात असलेल्या यंत्रणा आणि योजनांचा अंमलबजावणी वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अक्कलकुवा तालुक्यात सर्वाधिक बालविवाह सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या दुर्गम भागात बालविवाहांचे प्रमाण अधिक आल्याचा समोर आले आहे.
बालविवाह रोखण्याची जबाबदारी ही स्थानिक पोलीस पाटलांवरती असतानाही त्यांची संख्या वाढल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
बालविवाह थांबवण्यासाठी राज्य शासनाकडून अनेक कठोर कायदे करण्यात आलेले आहेत. मात्र त्यांची अंमलबजावणी जिल्ह्यात होताना दिसून येत नाही. एवढ्या मोठ्या संख्येत बालविवाह होत असताना ते थांबवण्यासाठी केलेल्या कारवाईची आकडेवारी अत्यंत दयनीय अशी आहे.
बालविवाह वाढण्याची कारणे
नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षणाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असल्याने, पारंपारिक चालीरीतीने विवाह संस्कार केले जातात. त्यातच गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रशासकीय यंत्रणांचा प्राधान्यक्रम बदलला होता. त्यामुळेच या अडीच वर्षांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक वाढल्याचा दिसून येत आहे.