धक्कादायक, औषध फवारणीत शेतकऱ्यांचा मृत्यू पण...विषाचा अंश नाही!
कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये विषाचा अंश आढळलेला नाही. ३५ विषबाधितांचे नमुने जिल्हा रुग्णालयाने अमरावतीच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या अहवालांमध्ये विषाचा अंश आढळला नव्हता.
यवतमाळ : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये विषाचा अंश आढळलेला नाही. ३५ विषबाधितांचे नमुने जिल्हा रुग्णालयाने अमरावतीच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या अहवालांमध्ये विषाचा अंश आढळला नव्हता.
तसंच १३ मृतांच्या शवविच्छेदन अहवालात व्हिसेरामध्ये विषाचा अंश मिळला नसल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर चार नमुने दिल्लीच्या एम्समधल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. या अहवालातही विषाचा अंश नसल्याचं म्हटलंय.
यवतमाळ जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या काळात कीटकनाशक फवारणी करतांना विषबाधा होऊन २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ७००हून अधिक शेतकरी विषबाधित झाले. शेतकऱ्यांचे रक्त तपासणीला पाठविण्यासाठी उशीर झाला असावा किंवा डॉक्टरांनी चुकीचे औषध दिलं असावे, त्यामुळे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.
या अहवालांमध्ये विषाचा अंश नसल्याचं म्हटलं असलं तरी प्रथामिक अहवालानुसार मृत्यूचं विषबाधाच असल्याचं वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. सध्या रुग्णालयात पाच विषबाधित रुग्ण भरती असून एक व्हेंटिलेटरवर आहे.
दरम्यान, नाशिकातल्या शेतकऱ्यांना विषबाधेप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आचारी आणि कंत्राटदार अटकेत आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांचा शोध सुरु आहे.
तर औरंगाबाद बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी कंपनी पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आली आहे. अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालेय. दोघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.