सतिश मोहिते, नांदेड : पुराच्या पाण्याने वेढलेल्या वधूच्या गावात पोहोचण्यासाठी नवरदेवाने चक्क थर्मोकॉल वरून 7 किलोमीटरचा धोकादायक प्रवास केला. नांदेड जिल्ह्यातील हा नवरदेव आहे. 'उतावळा नवरदेव गुडघ्याला बाशिंग' अशी म्हण आहे या नवरदेवाने या म्हणीचा प्रत्यय दिला आहे. नांदेड जिल्ह्यात पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाले ओसांडून वाहत आहेत, परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. वाहतुकही बंद आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर परिस्थितीमुळे हदगाव तालुक्यातील करोडी येथील शहाजी माधव राकडे यांचा विवाह नात्यातीलच उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथील गायत्री बालाजी गोंडाडे यांच्याशी ठरला होता. ठरल्या प्रमाणे 14 जुलै रोजी गुरूवारी सकाळी वधुकडे टिळा कुंकु पानवट्याचा आणि रात्री हळदीचा कार्यक्रम होता. 


वधूचे गाव संगमचिंचोली हे पैनगंगानदी व कयाधू नदीचे संगम स्थान आहे. पण वधूच्या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा असल्याने पोहचायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. पण काही करून लग्नाला पोहचायचे असे नवरदेवाने ठरवले. 


नवरदेवाने धोका पत्करून जायचे ठरवले. चक्क थर्मोकॉल च्या एका बॉक्स वरून 7 किलोमिटर अंतर कापत नवरदेव सासरवाडी संगम चिंचोली येथे सुखरूप पोहचला. नवरदेवासह काही नातेवाईक असेच थर्मोकॉल वरून प्रवास करत पोहोचले. गुरुवारी टिळ्याचा, कुंकू पानवाट्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 



शुक्रवारी 15 जुलै रोजी लग्न आहे. पावसाने उघडीप दिली आणि रस्ता सुरू झाला तर वऱ्हाडी मंडळी  वाहनाने जाऊ शकणार आहेत.