नांदेड : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत आहे. त्यातच आता म्युकरमायकोसीसच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे डॉक्टरांकडून रुग्णांची लूट करण्यात येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेड येथे घडला आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही तीन दिवस उपचार सुरु होते. याचे कारण धक्कादायक पुढे आले आहे. हे सगळे वाढीव बिलासाठी सुरु होते. या रुग्णालयाच्या लुटीबाबत डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कहर म्हणजे एवढे सगळे करुनही मृत्यू प्रमाणपत्रासाठीही संबंधित डॉक्टरने पैसेही मागितले. या प्रकारानंतर संताप व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाकाळात अनेक ठिकाणी खासगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारण्यात येत होती. याबाबत राज्य सरकारने दखल घेत कोणाची तक्रार असेल त्यावेळी रुग्णालयाच्या बिलाचे ऑडिट करण्याचे ठरविले. त्याला कुठे तरी चाप बसत होता. मात्र, काही रुग्णालयांकडून लूट सुरुच आहे. नांदेड येथील गोदावरी रुग्णालयात असाच प्रकार पुढे आला आहे. कोरोना रुग्णावर उपचार सुरु होते. दरम्यान, कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्यामुळे मृत्यूनंतरही एका कोरोना रुग्णावर तीन दिवस उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही बाब कोरोना बाधित रुग्णाच्या पत्नीने उघड केली आहे.


याप्रकरणी रुग्णाच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी 16 एप्रिल 2021 रोजी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबाकडून अनामत रक्कम म्हणून 50,000 रुपये घेतले. रुग्णालयात उपचार सुरु असताना रुग्णाची तब्बेत खालावत गेली आणि 20 एप्रिलला अतिदक्षता विभागात त्याला हलविण्यात आले. त्याच दिवशी 35 हजार रुपये इंजेक्सनसाठी द्यावे लागतील असे सांगितले.  24 एप्रिल रोजी रुग्णाच्या पत्नीने पैशाची जमवाजमव केली. आणि जमलेले 90 हजार रुपये सकाळी रुग्णालयात जमा केले. त्यानंतर दुपारी 12 वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. पत्नीने मृतदेह आणि उपचाराची कागदपत्रे मागितली, परंतु रुग्णालयाकडून संबंधित कागदपत्रे देण्यास नकार दिला.


दरम्यान, रुग्णालयाने मृतदेह ताब्यात दिल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दि. 26 एप्रिलला उपचाराबाबतची कागदपत्रे पत्नीला देण्यात आली. यात कागदपत्रात रुग्णाचा मृत्यू 21 एप्रिल 2021 रोजी झाल्याचे नमुद करण्यात आले होते. तरीही पुढील तीन दिवसांची बिले खर्चात जोड्यात आली होती. तसेच मृत्यूप्रमाणपत्र देण्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी पत्नीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.