Video: नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! धबधब्याजवळ ड्रोन उडवल्याने मोहोळ उठलं अन्...
Shocking Video Honey Bee Attack In Nashik: वॉटरफॉल रॅपलिंग या साहसी खेळासाठी गिर्यारोहकांचा एक गट या धबधब्यावर गेला होता. त्यावेळेस हा प्रकार घडला.
Shocking Video Honey Bee Attack In Nashik: नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाजवळ असलेल्या शितकडा धबधब्यावर रॅपलिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकांच्या तुकडीवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास हा सारा प्रकार घडला असून हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती होती यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या हल्ल्यामध्ये एकूण 20 ते 25 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, इगतपूरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम जंगलामध्ये 350 फूट उंचीचा शितकडा धबधबा आहे. कल्याणमधील एका संस्थेच्या माध्यमातून या धबधब्यावर मागील तीन महिन्यांपासून साहसी खेळांचं आयोजन केलं जात आहे. अशाच एका गटाला घेऊन आयोजक रविवारी या धबधब्यावर पोहोचले होते. कल्याण, गुजरात आणि दक्षिणेकडील राज्यातील काही लोकांचा समावेश असलेला गिर्यारोहकांचा हा गट रविवारी दुपारपर्यंत शितकडा धबधबा परिसरामध्ये साहसी खेळांच्या उद्देशाने पोहोचले. धबधब्यावरुन वॉटरफॉल रॅपलिंग करण्याची तयारी सुरु असतानाच या ठिकाणाच्या निरिक्षणासाठी आयोजकांकडून ड्रोन उडवण्यात आल्याने मधमाशांचे एक मोठे मोहोळ उठले आणि या मधमाशांनी या गटावर हल्ला केला.
मधमाशांनी हल्ला केल्यावर एकच धावपळ
रविवारी एकूण 50 पेक्षा अधिक पुरुष आणि महिलांचा समावेश असलेला पर्यटाकांचा हा गट दुपारी 12 च्या आसपास धबधब्याच्या मुखाजवळ पोहोचला. निरिक्षण करण्यासाठी ड्रोनद्वारे तपासणी सुरु असतानाच त्याचा अवाजाने किंवा ते मधमाशांच्या पोळ्याच्या अधिक जवळ गेल्याने मधमाशांनी या गटावर हल्ला केला. मधमांशांचा हल्ला झाल्याचं समजताच एकच गोंधळ उडाला. रॅपलिंगसाठी हेल्मेट, हार्नेसवगैरे घालून तयार असलेल्या पर्यटकांची एकच पळापळ झाली. यावेळेस प्रसिक्षकांनी सर्वांना ओरडून धावपळ न करता आहात त्याच ठिकाणी जमीनीवर झोपा असं सांगितलं. मात्र यानंतरही अनेकांची हलचाल सुरु होती. त्यांना प्रशिक्षक निर्देश करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. बराच वेळ या मधमाशा या परिसरावर घोंगावत होता.
प्रशिक्षकही जखमी
या साऱ्या प्रकारामध्ये प्रशिक्षक जयस्वार यांनी गिर्यारोहकांच्या गटाला वाचवण्यासाठी विशेष प्रयत्न आणि मार्गदर्शन केलं. पर्यटकांना वाचवण्याच्या नादात ते सुद्धा मधमाशांनी डंक केल्याने जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून निसर्गाशी खेळायला गेल्यास असेच होणार अशा अर्थाच्या प्रतिक्रिया नोंदवल्यात. सामान्यपणे अशापद्धतीने मधमाशांनी हल्ला केल्यानंतर जमीनीवर पडून राहणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जेवढी हलचाल करणार तेवढ्या या मधमाशा अधिक चावतात. मधमाशांनी डंक केल्यानंतर काही औषध तात्काळ उपलब्ध नसल्यास प्रथमोपचार किंवा उपचार मिळेपर्यंत अनेकजण चावा घेतलेल्या ठिकाणी मातीही लावतात.