आता श्रीपाद छिदमला ठेवायचं कुठं? जेल प्रशासनाला प्रश्न
अहमदनगर उपकारागृहातून श्रीपाद छिदमला नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या, श्रीपाद छिंदमला आता कोणत्या जेलमध्ये आणि कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रश्न उभा ठाकला आहे, कारण अहमदनगर उपकारागृहातून श्रीपाद छिदमला नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे.
कैद्यांनी त्याचा छळ केल्याची चर्चा
अहमदनगर जेलमध्ये कैद्यांनी त्याचा छळ केल्याची चर्चा आहे, आणि यावरूनच त्याला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलंय, सुरूवातीला पोलिसांनी त्याला येरवडा जेलमध्ये हलवत असल्याचं सांगून नाशिक जेलला रवाना केल्याचं सांगण्यात येत आहे.
छिंदमविरोधात कैद्यांचा संताप
विशेष म्हणजे, छिंदमविरोधात कैद्यांचा संताप पाहता, अत्यंत गुप्तपणे अहमदनगरहून नाशिक कारागृहाच्या दिशेने नेण्यात आले. येरवाडा कारागृहात छिंदमला हलवलं जात असल्याचे सांगून, पोलिसांनी ऐनवेळी गाडी बदलली आणि नाशिककडे नेले. त्याला आता नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
अहमदनगर जेलमधून नाशिकजेलला
अहमदनगर उपकारागृहातून छिंदमला बाहेर काढताना, उपकारागृहाच्या परिसरातील लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. कुणालाही कळू न देता छिंदमला नाशिक कारागृहात नेण्यात आले आहे, छिदमच्या सुरक्षिततेचा प्रश्न जेल प्रशासनासमोर आहे.