प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : बाबा रामरहीम.. राधे माँ... अशा भोंदू बाबांचे एकापाठोपाठ एक कारनामे उघड झाल्यानंतर आता त्यांच्यासारखे अनेक भोंदूबाबा आणि त्यांचे प्रताप समोर येऊ लागलेत.. रत्नागिरीतही अशाच एका भोंदू बाबाला आता अटक करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीचा भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटीलला अटक करण्यात आलीये. शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ही कारवाई केली आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच या बाबावर कारवाई करण्यात आलीये. दुपारी या बाबाला कोर्टात हजर केले जाणार आहे. 


रत्नागिरीतला या पाटीलबाबाचे हे कारनामे पाहून याला बाबा म्हणावं की अभिनेता असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.. कारण कधी हा बाबा फिल्मी गाण्यावर नाचताना दिसतो... कधी स्वत:ला स्वामींचा अवतार असल्याचं सांगतो (मी स्वामी समर्थ असल्याचा आव हा बाबा आणतो...) तर कधी महिलांना अश्लिल भाषेत शिव्या देखील घालतो...त्याचे हे सगळे प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक संघटना त्याच्याविरोधात एकत्र आल्या.. 


श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटील बाबा असं या भोंदूबाबाचं नाव... हा भोंदूबाबा पूर्वी रत्नागिरी पोलीस खात्यात वाहन चालक म्हणून नोकरीला होता... मात्र नोकरी सोडली आणि त्यानं अशी भोंदूगिरी सुरु केली. रत्नागिरीतल्या झरेवाडीत स्वताचा मठ स्थापन केला.. अनेक भक्त जमवले.. मात्र एका धाडसी महिलेनं त्याचे सारे प्रताप उघडकीस आणले..


याच बाबामुळे अनेकांनी आपल्या मुलांना देखील गमावलंय... काहींच्या मुलींचं आयुष्य यानं उद्धवस्थ केलंय.. पण आब्रू जाईल या भितीनं आजवर त्याच्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली नव्हती.. मात्र धाडसी महिलेच्या तक्रारीवरुन आता पाटील बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही झालीये. 


आसाराम, रामपाल, नारायण साई, राधे माँ या आणि अशा अनेक भोंदूबाबांची पोलखोल झाल्यानंतर आता सरकारनं त्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केलीये.. या भोंदूबाबांसारखे अनेक महारथी आजही आपलं प्रस्थ मांडून बसलेत.. लोकांच्या श्रद्धेचा, अशिक्षितपणाचा फायदा घेत स्वताला साधू म्हणवणा-या अशा संधीसाधूंपासून आता जनतेनंच सावध रहायला हवं..