नगरसेवक श्रीपाद छिंदम पुन्हा एकदा अडचणीत
श्रीपाद छिंदमच्या अडचणी काही संपेनात...
अहमदनगर : महापालिका निवडणुकीत अर्ज पूर्ण न भरल्यामुळे श्रीपाद छिंदम याच्या विरोधात अहमदनगर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांच्याच प्रभागातील अपक्ष उमेदवार निलेश म्हासें यांनी ही याचिका दाखल केली असून छिंदम याला निवडून आल्यानंतरचे अधिकार आणि फायदे मिळू नयेत असा अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अर्ज भरताना माहितीचा कोणताही रकाना रिक्त ठेवता येत नाही असं असतांना छिंदम याने अर्ज दाखल करताना काही रकाने रिक्त ठेवले होते. यावर हरकत घेतली गेली मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज वैध ठरवलं यामुळे म्हासें यांनी अहमदनगर न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरल्यामुळे वादात सापडलेले अहमदनगरचे माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महाराजांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होत पापक्षालनाचा प्रयत्न देखील केला. सोमवारी महापालिका निवडणूक निकाल लागले. अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले छिंदम विजयी झाल्याने अनेकांना धक्का देखील बसला. त्यानंतर बुधवारी त्यांची तडीपारीची मुदत संपली.
शहरात येताच प्रथम त्यांनी आपल्या कार्यालयातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांचंही छिंदम यांनी पूजन केलं. सोमवारी १० डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या महापालिका निवडणूक निकालात छिंदम यांनी भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशी यांना पराभूत केलं आहे. प्रभाग क्रमांक ९ क मधून श्रीपाद छिंदम यांचा विजय झाला आहे.