मावळ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकलं आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड मध्ये ठाण मांडलय....! राज्यातल्या काना कोपऱ्यातुन राष्ट्रवादीचे नेते शहरात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सेनेच्या श्रीरंग बारणे यांची एकाकी झुंज असल्याचे चित्र पाहायला मिळतंय...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवारांचा नातू, अजित पवारांचा पुत्र असलेल्या पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला. पण मतदारसंघात येणाऱ्या 6 पैकी पाच ठिकाणी आघाडीचे आमदार असल्याने राष्ट्रवादीला ही लढाई सोपी नसल्याचा अंदाज आला आहे. म्हणूनच बारामतीची जबाबदारी संपताच अजित पवारांनी 23 तारखेला रात्रीच पिंपरी चिंचवड गाठले. धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी ही शहरात विशेष लक्ष घातलं आहे. तर आमदार सतीश चव्हाण, राणा जगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, मल्हार पाटील, दिलीप सोपल, माढ्याचे उमेदवार संजय शिंदे शहरात दाखल झाले आहे. 


बारामतीमधून कार्यकर्त्यांची मोठी रसद शहरात दाखल झाली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून संपूर्ण ताकत पणाला लावली जात असताना भाजप नेत्यांनी मात्र त्याच्यावर टीका केली आहे. तर राष्ट्रवादीने त्यात गैर काय असे म्हंटलं आहे.


दुसरीकडे श्रीरंग बारणे यांची मात्र एकाकी झुंज असल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा घेत बारणेंना हात देण्याचा प्रयत्न केलाय खरा, पण राष्ट्रवादी च्या फौजफाट्याचा विचार करता बारणे चक्रव्यूहात अडकले असल्याचे चित्र आहे.