रायगड : कोरोनाच्या विळख्यातून सुटण्यासाठी जगभरात प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार देशातील शहरांवर आज शुकशुकाट दिसतोय. दरम्यान परदेशातून आलेल्यांना स्वत:हून क्वारंटाईन होण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. श्रीवर्धनमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार पाहायला मिळाला. श्रीवर्धनच्या खारशेत भावे गावातील तिघे होम क्वारंटाईन असतानाही बाहेर रस्त्यावर फिरत होते. यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिघी सागरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिघेजण सौदी आणि दुबई येथून भारतात आले होते.



राज्यात १२ नवे रुग्ण 


राज्यात शनिवारी १२ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे महाराष्ट्रात आता कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४ वर पोहचलाय. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. १२ नवीन कोरोनाग्रस्तांपैकी, ८ रुग्ण मुंबई, २ पुणे, १ कल्याण आणि १ यवतमाळमध्ये आढळून आले. या १२ रुग्णांपैकी १० रुग्ण परदेशातून परतलेले आहेत. 


शनिवारी परदेशातून आलेल्या २७५ लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्त देशांतून १८६१ प्रवासी आले आहेत. रविवारी कुर्लामध्ये कोरोना संशयित ८ रुग्ण आढळून आले. हे सर्व संशयित दुबईहून मुंबईत आले आणि त्यांना मुंबईहून पुन्हा संध्याकाळी प्रयागराज येथे जायचं होतं. या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प लावण्यात आला आहे.