मुंबई : क्यार वादळाचा सिंधुदुर्गातील देवगड, मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत आहेत. शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगड तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली आहेत. क्यार वादळामुळे काही मच्छिमारांची जाळीही सुमद्रात वाहून गेल्याचं समजतं आहे. भात शेतीत पाणी साचून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रात उठलेल्या 'क्यार' चक्रीवादळाची तीव्रता वाढत असली तरी ते पश्चिमेला सरकत असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत वादळी पाऊस होण्याची शक्यता कमी झाली आहे. किनारपट्टी भागातील हवामान रविवारपासून सामान्य होणार असल्याचं हवामान विभागाचे उपमहासंचावक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.


क्यार चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरीच्या किनारपट्टीला देखील बसला. चक्रीवादळामुळे समुद्र चांगलाच खवळला आहे. अजस्त्र लाटांचा मारा किनारपट्टी भागात झाला. रत्नागिरीच्या मांडवी किनारपट्टीतही समुद्राचं पाणी मानवीवस्तीत घुसलं. तसेच या वादळाचा फटका हा गणपतीपुळे देवस्थानला देखील बसला आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर, बोर्या बंदर या ठिकाणी देखील लाटांचा मारा अधिक होता. तसेच हर्णे, आंजर्ले आणि दाभोळ किनारपट्टीला देखील याचा फटका बसला आहे.


अरबी समुद्रात तयार झालेलं क्यार चक्रीवादळ रायगडच्या दिशेने सरकण्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच खोल समुद्रात गेलेल्या बोटी परत किनाऱ्यावर आणाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.