Sindhudurg Crime : कोकणातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यात एका दिराने त्याच्या वहिनीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीने वहिनीने आत्महत्या केली आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलीस तपासात ही हत्या असल्याचे समोर येताच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी दीराला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सावंतवाडी इथल्या सबनीसवाडा या ठिकाणी एका 35 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलीस तपासात ही हत्या असल्याचे उघड झालं आहे. महिलेच्या दीरानेच ही हत्या केल्याचे समोर आलं आहे. मृत महिलेचे नाव चैत्राली निलेश मेस्त्री (35) असून तिचा चुलत दीर संजय ऊर्फ संदेश धोंडू मेस्त्री (19) याने; तिचा खूण केल्याचा पोलिसांनी उघड केलंय. ओढणीने गळफास लावून चैत्रालीची हत्या केल्याची कबुली आरोपी संदेशने दिली आहे.


नेमकं प्रकरण काय?


मृत चैत्राली मेस्त्री ही लग्नाआधी पुण्यातील कोथरूड येथे राहत होती. लग्नानंतर चैत्राली रत्नागिरीतील खेड येथे पती निलेश मेस्त्री याच्यासोबत राहू लागली. दोघांना तीन मुलं आहेत. मात्र तिचा पती चैत्रातीला सातत्याने दारू पिऊन मारहाण करत होता. सततच्या या त्रासाला कंटाळून चैत्रालीने माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून ती आपल्या माहेरी राहत होती. त्यानंतर अचानक संदेश चैत्रालीच्या माहेरी गेला. त्याने चैत्रालीला तिला गोव्यात येण्यासाठी खूपदा विनंती केली. पण संदेशलासुद्धा दारूचे व्यसन असल्याने तिने सुरुवातीला जाण्यास नकार दिला. नकारामुळे संतापलेल्या संदेशने तिच्या मुलांना जिवंत ठार मारण्याची धमकी दिली.


या धमकीला घाबरून चैत्राली त्याच्यासोबत गोव्याला जाण्यास तयार झाली. संदेशने चैत्रालीला गोव्यात घेऊन न जाता तिला सांवतवाडीत उतरवलं व काही दिवस इथेच मुक्काम करावा लागेल अशी तिची समजूत काढली. गेल्या दोन महिन्यांपासून सांवतवाडीतील सबनीसवाडा येथे एका भाड्याच्या घरात राहू लागले. त्यांचासोबत चैत्रालीचा 8 वर्षाचा मुलगा देखील राहत होता. मात्र सगळं काही सुरळीत सुरु असताना एकेदिवशी तिचा चुलत दीर तिला घेऊन बाजारात गेला. तिथं त्यानं तिला मासे व चिकन घेऊन दिले. त्यानंतर चैत्राली घरी गेली व तो कामावर परतला. दुपारच्या जेवाणाकरता संदेश घरी आला. त्यादरम्यान त्यानं तिच्या मुलाला बाहेर खेळायला पाठवून दिले व दरवाजाला आतून लॉक करुन घेतलं. 


मात्र तितक्यातच संदेशने चैत्रालीला जेवण का वाढले नाहीस यावरुन तिच्यासोबत भांडायला सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संदेशने रागाच्या भरात चैत्रालीचे डोकं भिंतीला आपटलं. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने तिला गळफास लावून छपराला लटकवले. आरोपी संदेशने एवढ्यावरच न थांबता तिचा मृत्यू झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तिच्या पायाला चटके देखील दिले गेले. चैत्रालीचा जीव गेल्याची खात्री होताच संदेशने तिच्या मुलाला बोलावून घेतलं आणि तिने आत्महत्या केल्याचं नाटक रचलं.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांना देखील हे प्रकरण आत्महत्येचे वाटलं होतं. मात्र शवविच्छेदनानंतर चैत्रालीचा खून झाल्याचे स्पष्ट झालं. मृतदेहाच्या शरीरावरील जखमांमुळे संदेशवर पोलिसांना संशय आला. सावंतवाडी पोलिसांनी संदेशला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र कठोर चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.