Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue :  सिंधुदुर्गाजवळील मालवणच्या समुद्रकिनारी असलेल्या राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी संतप्त आहेत.आता या  दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटन्ट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र, गुन्हा दाखल होताच आपटे आणि पाटील दोघेही फरार झालेत. कोल्हापुरात चेतन पाटील यांच्या घरी पोलिस गेले असता घरात कुणीच नव्हतं.. गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेणं अपेक्षित असताना,पोलिसांनी चेतन पाटील यांना फरार होण्याची संधी दिली का ?असा संतप्त सवाल शिवप्रेमी व्यक्त करत पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केलीय.  शिवरायाच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर चेतन पाटील यांच्याप्रमाणेच जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झालाय.


सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल दिलीय. तक्रारीनंतर मालवण पोलिस स्थानकात  आर्टिस्टरी कंपनीचे मालक असलेले शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सलटन्ट चेतन पाटलाविरोधात सदोष मनुष्यवध, शासनाची फसवणूक यासह गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या FIRमध्ये काय?


जयदीप आपटे, चेतन पाटील यांनी निकृष्ट पुतळा उभारला.  पुतळा उभारताना परिपूर्ण अभ्यास केला नाही. पुतळा सुस्थितीत आणि सुरक्षित उभा राहण्यासाठी आवश्यक काळजी घेतली नाही.   शासनाची फसवणूक तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याचे FIR मध्ये म्हंटले आहे.  


चुकीच्या, निकृष्ट पद्धतीनं पुतळा उभारुन जीवितहानीचा प्रयत्नशिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यावर शिल्पकार भगवान रामपुरे यांनी  दुःख व्यक्त केलंय. मर्जीतल्या आणि वशिलेबाज लोकांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं  प्रकरण महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.  राज्य सरकारनं हे प्रकरण अत्यंत गांभीर्यानं,जबाबदारीनं हाताळायला पाहिजे होतं तसं दिसलं नाही. दुर्घटनेची जबाबदारी नौदलावर ढकललून हात झटकण्याचे प्रयत्न सुरू होते. या सर्वच प्रकरणात सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतंय. त्यातच गुन्हेगारही फरार झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण आहे.