मुंबई : 'सिंघम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेता अशोक समर्थ म्हणजेच 'शिवा'सुद्धा निवडणुकांच्या निमित्ताने होत असणाऱ्या प्रचारांच्या रणधुमाळीमध्ये उतरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमुख शरद पवार यांच्या कर्जत जामखेड आणि बारामती या मतदार संघांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांच्या याच प्रचारसभांमध्ये कलाविश्वातील या सेलिब्रिटीची उपस्थिती पाहायला मिळाली. पवारांच्या भाषणाच्या वेळीच त्यांच्या मागे उभ्या असणाऱ्या अशोक समर्थनेही सर्वांचं लक्ष वेधलं. शुक्रवारी शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात घेतलेल्या प्रचारसभेची चर्चा शमत नाही तोच आता अखेरच्या टप्प्यातील प्रचारसभांनीही सर्वांचं लक्ष वेधले आहे. 


फक्त राष्ट्रवादीच नव्हे, तर इतरही अनेक पक्षांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने काही स्टार प्रचारकांच्या सहाय्याने मतदार संघांचे दौरे केले होते. यामध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे आणि भाऊ कदम यांनी बहुजन विका़स आघाडीच्या प्रचारफेरीत सहभागी होत मतदारांची भेट घेतली. तर, दुसरीकडे अभिनेता गोविंदासुद्धा मलकापूरमध्ये या प्रचारांमध्ये उतरला होता. 


अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांच्या या सत्रात काही सेलिब्रिटी मंडळींनी आणि त्यांच्याशी संलग्न मंडळींनी थेट राजकारणात प्रवेश करतही सर्वांना धक्का दिला. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता सलमान खान याचा अंगरक्षक शेराचं. शिवसेनेत प्रवेश करत भाईजान सलमानचा हा शेरा प्रकाशझोतात आला आहे. यंदाच्या वर्षी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे त्यांना कलाविश्वातूनही  बराच पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत अभिनेता संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी, डिनो मोरिया यांनी आदित्य यांना पाठिंबा दिला आहे. 


स्टार प्रचारकांची ही गर्दी आणि एकंदरच प्रेक्षकांमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता पाहता नेतेमंडळींना ते किती फायद्याचे ठरतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.