कौटुंबिक वादातून लातूरमध्ये मेहुणीची हत्या
ही महिला आरोपीची सख्खी मेहुणी होती
लातूर : लातूर येथे कौटुंबिक वादातून मेहुणीची हत्या करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना आदर्श कॉलनी येथे घडली. महिलेचे नाव उषा मुळे असून, लातूर शहराच्या मंत्रीनगर भागातील ती रहिवासी होती.
उषा ही आरोपीची सख्खी मेहुणी होती. आपला संसार उदध्ववस्त करणारं दुसरं कोण नसून, याला मोठी मेहुणीच जबाबदार आहे, असा राग आरोपी दिगंबर कोटकोर त्याच्या मनात कित्येक दिवसांपासून होता. सकाळी उषा तिच्या खासगी कामासाठी घराबाहेर पडली असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. उषा आदर्श कॉलनीमधून जात असताना त्या रस्त्यात कोणीही नाही, हे पाहून आरोपीने उषाला अडवले आणि तो तिच्यासोबत वाद घालू लागला.
'माझ्या संसाराला तूच जबाबदार आहे', असे बोलत आरोपीने उषावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला इतका भयंकर होता, की उषा यांना रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच प्राण गमवावे लागले. पोलिसांच्या माहितीनुसार, दिंगबर खूप दिवसांपासून उषाला मारण्याच्या कट रचत होता असे पोलिसांना दिसून आले आहे. आरोपी केवळ एका संधीची वाट बघत होता. आदर्शनगरच्या परिसरात जास्त लोक नसल्याचा फायदा दिगंबरने घेतला. महत्वाचे म्हणजे, खून केल्यानंतर दिगंबर याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. लातूरच्या शिवाजीनगर येथील पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.